गुन्ह्यांचा तपास आधुनिक पद्धतीने होण्यासाठी सायबर पोलीस ठाणे उपयुक्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गुन्ह्यांचे स्वरुप बदलत असताना आता पोलिसांचा तपासही आधुनिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर पोलीस ठाणे, तसेच दिलासा सेल (वन स्टॉप सेंटर) याचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, जिल्हा परीषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सध्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. गुन्ह्यांची पद्धती लक्षात घेऊन तपासाची पद्धत बदलावी लागत आहे. पारंपरिक गुन्ह्यांबरोबरच आता आर्थिक गुन्हे, सोशल मीडियाचा वापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळेच आता तपास यंत्रणांनाही अद्यावत व्हावे लागत आहे. 

अद्यावतीकरणामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जनजागृतीमुळे संभाव्य गुन्हेही टाळता येणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, महिलांच्या विविध प्रकारच्या फसवणुकीसंदर्भात त्यांना मार्गदर्शनासाठी सुरु कऱण्यात आलेल्या दिलासा कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी असे केंद्र महिलांसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. 

या दिलासा (वन स्टॉप सेंटर) केंद्रामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, विधी, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाईन, कौटुंबिक हिंसाचारासाठी संरक्षण अधिकारी, महिला हेल्पलाईन, पीडित महिलांना साह्य, समुपदेशन आदी सुविधा उपल्बध करुन दिल्या जाणार आहेत. यामुळे संकटात सापडलेल्या महिला, मुली, लहान मुले यांना तात्काळ मदत मिळू शकणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. 

महापौर कदम यांनी, ही सुविधा महिलांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी महाजन यांनी , आताच्या परिस्थितीत दिलासा कक्ष निश्चितच अडचणीत असलेल्या महिलांना आधार वाटेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शर्मा यांनी या दिलासा कक्ष आणि सायबर पोलीस ठाणे निर्मिती करण्यामागील भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक श्रीमती माने यांनी केले. यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते सायबर गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पुस्तिका आणि दिलासा कक्षाच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.