पाटाच्या चाऱ्यावर पोलीस दिसले तर गाठ माझ्याशी - शंकरराव गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अधिकाऱ्यांना पैसे देऊनही पाटपाणी व रोहित्र मिळत नाही, शेतीमालाला भाव नाही; त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत सुकाणू समितीचे जसे आदेश येतील त्याच प्रकारे यापुढील आंदोलन होतील. त्याबरोबर पाटाच्या पाण्यासाठी चाऱ्यावर पोलीस यापुढे दिसले तर माझ्याशी गाठ राहील, अशा शब्दांत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला इशारा दिला.


कर्जमाफीसाठी सुकाणू समितीने जाहीर केल्याप्रमाणे आज चक्काजाम आंदोलन वडाळा येथे करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सुमारे दोन तास चाललेल्या रास्तारोकोमुळे नगर- औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. कुकाणा, गेवराई परिसरातील गावांना पाणी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी पैसे भरल्याचे पुरावे घेऊन आंदोलनात सामील झाले होते. 

या 22 गावांसह तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेत पाणी देऊ, असे कार्यकारी अभियंता यांनी आश्‍वासन दिले तरच रस्त्यावरून उठू, अशी खंबीर भूमिका शंकरराव गडाख यांनी घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, अभियंता मोरे यांनी मोबाइलवरून गडाख यांच्याशी संपर्क साधून तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांचे भरणे वेळेत करू, असे आश्‍वासन दिल्याने गडाख यांनी माघार घेतली.

गडाख म्हणाले, कर्जमाफीसाठी अर्ज करताना किचकट अटी आहेत. त्यामुळे शेतकरी अर्ज भरायला जात नाही. मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले तेव्हा त्यांचे तुम्ही हाताचे ठसे घेतले का? शेतकरी अर्ज करताना हाताचे ठसे घेऊन सरकारने एक प्रकारची चेष्टा लावली आहे.

सर्वात जास्त पेरणी नेवासा तालुक्‍यात झाली तरी जिल्ह्यातील अन्य तालुक्‍याला कोटी कोटी रुपये व तालुक्‍याला फक्त काही लाख हे अपयश आमदारांचे आहे. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी तालुक्‍यात मोठा धुडगूस घातला आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या आदेशाने येथे एवढा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

असे सांगून गडाख म्हणाले,लोकप्रतिनिधींनी हे पाप करण्याऐवजी पीकविमा, पाटपाणी मिळवून द्यावे. आपल्याकडे 70 हजार शेतकऱ्यांनी कांदा घातला. त्यापैकी फक्‍त 4 हजार शेतकऱ्यांना फक्‍त 1 रुपये अनुदान मिळाले. त्यासाठी तसेच आपले हक्काचे पाणी मराठवाड्याला जाऊ नये म्हणून याचिका दाखल केली आहे. 

मुळा धरणावर जलविद्युत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याची दुसऱ्या वेळेस चाचणी फसली आहे. त्यावेळेस 20 दिवस आवर्तन उशिरा सुटले होते. याची यापुढे आवर्तनाला अडचण होऊ शकते यावर कोणीच काही बोलत नाही. यापुढे शेतकऱ्यांची पिके जर जळाली तर पाटबंधारे कार्यालये नीट राहणार नाही, असा इशारा गडाख यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.