रणमले यांचे आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टिकोन देणारे ठरेल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सेवानिवृत्त शिक्षक तुळशीराम रणमले यांनी सकारात्मक दृष्टीने लिहीलेले आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टीकोन देणारे ठरेल असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व लेखक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तुळशीराम रणमले गुरुजी यांनी लिहिलेल्या 'एका शिक्षकाची आनंदयात्रा' (आत्मचरित्र ) व ' स्मृतिगंध ' काव्यसंग्रह प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी मंत्री शंकरराव राख याच्या अध्यक्षतेखाली शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास शब्दगंधचे माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव देवढे, जिल्हापरिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी पी.आर.शिंदे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड. सुभाष लांडे, सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव पाटील, माजी सभापती डॉ. टि. के. पूरनाळे, बापूसाहेब भोसले, आंदकोळ चे लेखक किसन चव्हाण, उद्योजक सी.जी.आगलावे, मुरलीधर ढाकणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.लुलेकर म्हणाले की, रणमले यांच्या लिखाणावर गांधी आणि नेहरूंचा प्रभाव आहे. आपल्या शिक्षकीपेशा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केला. शिक्षणाचा बाजार मांडणारे शिक्षण महर्षी आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे न पार पडणाऱ्या शिक्षकांनी या आत्मचरित्रापासून बोध घेतला पाहिजे व आपल्यातील चांगल्या प्रवृत्ती जाग्या करून समाजाचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्राचार्य शिवाजीराव देवढे म्हणाले या आत्मचरित्रातून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.अलीकडच्या काळात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली आहे. शिक्षकांनी राजकारणाच्या गाडीला जोडल्यामुळे शिक्षणाचे वाटोळे होत आहे. अशा परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकरांना अभिप्रेत असलेला शैक्षणिक दृष्टीकोन या पुस्तकामुळे निर्माण होवो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अॅड. कॉ. सुभाष लांडे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण आदर्श व दर्जेदार होते. शिक्षकांची समाजावर आदरयुक्त दरारा व वचक होता. रणमले गुरुजी सारख्या शिक्षकामुळे अनेक पिढ्या घडल्या व प्राथमिक शिक्षणाने भक्कम पाया घडवला.

रणमले गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून आपला ८५ वर्षाचा जीवनप्रवास सारांश रूपाने मांडला. सर्वांचे प्रेम, शुभेच्छा व शिक्षणातील सेवेचे चांगले फळ मला मिळाले असे ते म्हणाले.यावेळी शंकरराव राख, पी.आर.शिंदे, प्रा. किसन चव्हाण, सी.जी.आगलावे यांचीही भाषणे झाली. शब्दगंधच्यावतीने रणमले गुरुजी यांच्या ८५ व्या वर्षातील पदार्पणाबद्दल त्यांचा शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अॅड. मिनानाथ देहाडराय व सुनिल काकडे यांच्या हस्ते आंतरवाली येथील छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयास शब्दगंधच्या वतीने पाच हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देण्यात आली. 

शाहीर भारत गाडेकर यांनी गायिलेल्या वंदन माणसाला या लोककवी वामन दादा कर्डक यांच्या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. डॉ. प्रल्हाद लुलेकर व माजी मंत्री शंकरराव राख यांच्या हस्ते आत्मचरित्र व काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी व भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र फंड यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.