गायब झालेले आदिनाथ शास्त्री महाराज पंढरपूरमध्ये.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तारकेश्वर गडाचे महंत हभप आदिनाथशास्त्री महाराज रविवारी मध्यरात्रीनंतर गडावरून नगरला गेले होते. तेथून ते अचानक गायब झाल्याने गडाचे भक्त हवालदिल झाले होते. भक्तांनी तातडीने शोधमोहीम राबविली. दुपारनंतर महाराज पंढरपूर येथे असल्याचे समजल्याने भक्त सुखावले. तारकेश्वरगड हे पाथर्डी व आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवरील धार्मिकस्थळ आहे. 

गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी आपली कुंडल व वाहन गडावर सोडले. अशोक उबाळे यांना फोन करून बाबांनी बोलावले व मोटारसायकलवरून महाराज मध्यरात्रीनंतर पाथर्डीला आले. तेथून अहमदनगरला गेले. तेथील बसस्थानकावर लघुशंकेला जाऊन येत, असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने तुम्ही गडावर जा, मला शोधू नका, असा फोन करून निरोप महाराजांनी दिल्याने उबाळे घाबरले. उबाळे यांनी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात महाराज हरवल्याची तक्रार दिली.

सोशल मीडियावरून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गडाचे व महंतांचे भक्तही हवालदिल झाले. महाराजांना शोधण्यासाठी पुणे, औरंगाबाद, मुंबई, पंढरपूर,आळंदी येथे शोधमोहीम राबविली. पाथर्डी शहरातील सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी महाराजांचा शोध घेतला. अखेर महाराज पंढरपूर येथे असल्याचे समजले. .

महाराजांचा भ्रमणदूरध्वनी बंदच असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. महाराज पंढरपूर येथे असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महाराजांच्या गडावर असणारे काही शिष्य पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. गडावरील विकासकामांत राजकीय हस्तक्षेप, विकासकामात येणारे अडथळे, व्यक्तिगत हेवेदावे, पाण्याचा वाद,अशा विविध कारणांमुळे महाराज गड सोडून गेल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. महाराज गडावर परतल्या नंतरच खरे कारण समजू शकेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.