आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाने दणानले जिल्हा परिषद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चाने परिसर दणानून निघाला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांंडून, जोरदार निदर्शने केली. 


बुरुडगाव रोड येथील भाकप पक्ष कार्यालया पासून मोर्चाला प्रारंभ होवून, बुरुडगाव रोड मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. आंदोलनात जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर, अध्यक्ष शमा सय्यद, संघटक कॉ.सुभाष लांडे, कॉ.भगवान गायकवाड, कॉ.बन्सी सातपुते, यमुना दौंड, निशा जमधडे, निर्मला खोडदे, उषा आहेर, सुनिता पावसे, कॉ.अस्लम सय्यद, गिता सोनवणे, सौ.पोकळे, प्रमिला ढाकणे, भांगरे ताई, कॉ.संजय डमाळ, संध्या पोटफोडे, संगीता गायकवाड, कॉ.संतोष लहासे आदि सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या वतीने विविध प्रश्‍नासंदर्भात अनेक आंदोलन करुन, न्यायालयात दादही मागण्यात आली. मात्र मिळालेले फलीत अत्यंत तटपुंजे असून, शासन व प्रशासनाकडून आपल्याला योग्य वेळी कामाचा मोबदला दिला जात नाही, कर्मचारी म्हणून गणना नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 

संघटनेच्या वतीने मागील हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चास पंधरा हजार रुपये देण्याचे शासनाच्या वतीने आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी आश्‍वासन दिले होते. तसा अर्थसंकल्पामध्ये पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णयही झाला. परंतू शासन आदेश काढत नसल्याने मंगळवार दि.15 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आशा व प्रवर्तकांना राज्यव्यापी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय संघटनेच्या मागण्यानुसार दरमहा अठरा हजार वेतन द्यावे. सर्व आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करावे. आशा व गट प्रवर्तक महिलांना शासनाच्या आरोग्य खात्यातील रिक्त पदावर समाविष्ट करावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमपणे राबविण्याचे जाहीर करा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार आशांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देण्याची अंमलबजावणी करावी. आशा व गट प्रवर्तकांना सादीलवार खर्च मिळावा. एनबीएनसीच्या मिळाव्यात. पुरस्कारासाठी व बढतीसाठी लोकसंख्येचा विचार करण्यात यावा. फोन भत्त्यात वाढ करावी. तसेच सर्व गरोदर मातांच्या भेटीला गेल्यावर त्यांचे पैसे देण्यात येण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जि.प. आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले. स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी आंदोलकांना दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.