धर्मांध व जातीयवादी शक्तींविरोधात एकजुटीने व ताकदीने लढा देण्याची गरज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा व सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे या क्रातिकारकांची भूमि असून अन्यायाला विरोध करून विद्रोहाची वाट देशाला दाखवली आहे. देशात वाढत असलेल्या धर्मांध व जातियवादी शक्तींना या भूमिने कधीही थारा दिला नाही. हीच एकता, समानता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता असून आज धर्मांध व जातीयवादी शक्तींविरोधात एकजुटीने व ताकदीने लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनचे नेते कन्हैय्याकुमार यांनी केले.


दि. १५ जुलैपासून देशभर सेव्ह इंडिया, चेंज इंडिया हे घोषवाक्य घेवून निघालेल्या लॉंग मार्चचे काल रविवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात नगरमध्ये आगमन झाले. यावेळी आयोजित केलेल्या सभेत मार्गदर्शन करताना कन्हैय्याकुमार बोलत होते.

ते पुढे म्हणाले.की, देशामध्ये सध्या सर्वत्र हिंदुत्वाच्या नावाखाली मोदी सरकार नागरिकांना वेठीस धरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा राबवत आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटबंदी करत देशातीलच नागरिकांना रांगेत उभे करून शंभरहून अधिक निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचे पाप केले. अद्यापपर्यत किती काळा पैसा बाहेर आला याची आकडेवारी सरकारने जाहिर केली नसून बीएसएनएल या सरकारी कंपनीचे भवितव्य धोक्यात आणत सरकार खासगी मोबाईल कंपन्यांचे भले करत आहे.

देशात बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ
शेतकरी आत्महत्या करत असून देशात वर्षभरात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र तरीही सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गंभीर पाऊले उचलत नाही. देशातील कोणतीही मोठी समस्या न सोडवता ते केवळ लोकांना जात आणि धर्मांच्या नावाखाली लढवत आहे. देशात बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ होत असून नोटबंदीनंतर १५ लाख लोकांना आपल्या नौकऱ्या गमवाव्या लागल्यात ही चिंतेची बाब आहे.

मन की बात जनतेच्या मनापर्यत पोहचत नाही 
शेतकऱ्यांच्या नावाने सुरू केलेल्या विमा योजनाचे काम ज्या कंपनीकडे आहे ती कंपनी १० हजार कोटी रूपयांचा फायदा मिळवत आहे, मात्र आमचा शेतकरी दररोज मरत आहे. सिमेवर आमचा भाऊ मरतोय, शेतात आमचा बाप मरतोय अन सरकार आम्हाला देशभक्तीचा प्रश्न विचारत असल्याचे ते म्हणाले. मोदीजींची मन की बात जनतेच्या मनापर्यत पोहचत नसल्याचे ते म्हणाले.

नागरिकांनी खरंच स्वच्छता अभियान मनावर घ्यावं...
देशातील नागरिकांनी खरंच स्वच्छता अभियान मनावर घ्यावं आणि संघी, सनातनी विचार देशातून झाडून टाकत ते हद्दपार करणे गरजेचे आहे. रामराज्याच्या नावाखाली देशात नथूरामाचा विचार रूजवला जात आहे, मात्र ही डॉ. आंबेडकरांची, तुकोबांची आणि छत्रपतींची भूमि असून संघर्ष आमच्या रक्तात आहे. हे विचार आम्ही कदापी रूजू देणार नसल्याचे ते म्हणाले.

अहमदनगरच्या इतिहासाचे कौतुक
हा संघर्ष सध्याच्या काळात तीव्र करणे गरजेचे असल्याचे सांगत डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांची ते हत्या करू शकतात मात्र त्यांचे विचार मारू शकत नाहीत. कन्हैय्याकुमार यांनी यावेळी अहमदनगरच्या इतिहासाचे कौतुक करत ही भूमि स्वातंत्र्य, समता, बंधुता जपत असल्याबाबत अभिमान व्यक्त केला.

याप्रसंगी कॉ. स्मिता पानसरे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. सुभाष लांडे, कॉ. मेहबूब सय्यद, कॉ. बहिरनाथ वाकळे, कॉ. रामदास वाघस्कर, कॉ. अनंत लोखंडे, राजू शेख, युनुस तांबटकर, कॉ. बाबा आरगडे, अजय साळवे, अशोक गायकवाड, कॉ. जालिंदर घिगे, कॉ. आझाद ठुबे, रजत लांडे, सुधिर टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक संतोष खोडदे व आर्कि. अर्शद शेख यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.