अहमदनगर मधील सर्वच अतिक्रमणे हटविण्याची नगरकरांची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर मधील अतिक्रमणे हटविण्याची महापालिकेने सुरु केलेली मोहीम स्वागतार्ह आहे. परंतु ही मोहीम केवळ रुग्णालायांपुरती मर्यादित न ठेवता सर्वच अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक क्षेत्रात कार्यरत नगरकरांनी आज एका निवेदनाद्वारे महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पालक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे आज केली आहे.


रुग्णालयांनी वाहनतळाच्या जागेवर केलेली अतिक्रमणे काढण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाने त्या परिसरातील सर्वच अतिक्रमणांवर तशीच कारवाई केली नाही तर महापालिका केवळ वैद्यकीय व्यावसायिकांनाच दुजाभावाने वागविते, हे सिद्ध होईल असेही या निवेदनात नमूद आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठास या बाबत एक स्वतंत्र पत्र पाठविण्यात आले असून तेच याचिका म्हणून दाखल करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे.रुग्णालयांनी स्वतःच्या मालकीच्या जागांमध्ये वाहनतळाची जागा रुग्णसेवेसाठी वापरली.

परंतु अहमदनगर शहरात असणाऱ्या अनेक हॉटेल व उपहारगृहे, मंगल कार्यालये, बँका, पतसंस्था, दुकाने, शिक्षण संस्था तसेच तळमजल्यावर वाहनतळाच्या जागेत गाळे काढणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी वाहनतळाच्या जागाच नव्हे तर रस्ते, सरकारी आणि सार्वजनिक जागांवरही अतिक्रमणे केली आहेत.

त्यामुळे अहमदनगर शहराला अवकळा आली आहे. वाहतुकीची निर्माण झालेली प्रचंड मोठी समस्या निवारण्यासाठी रुग्णालयावरील कारवायीचा प्रत्यक्षात फारसा उपयोग होणार नसून त्यासाठी इतर अतिक्रमणांना नेस्तनाबूत करणे औचित्याचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.

अहमदनगर मध्ये असंख्य अतिक्रमणे होत असताना त्या भागातील महापालिकेचे अधिकारी तसेच म.न.पा तील वरिष्ठ अधिकारी, उपयुक्त व आयुक्त यांनी आजवर सातत्त्याने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. या सर्वांवर अतिक्रमणात सामील असल्याबद्दल फौजदारी गुन्हे तातडीने दाखल करण्याची तसेच त्यांच्या मालमत्तांची एन्फोर्समेंट डायरेकटोरेट (इडी) मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

सध्याच्या रुग्णालयांच्या कारवाईमुळे खाजगी रुग्णालयांची रुग्णसेवा पूर्णतः कोलमडणार असून महापालिकेच्या आणि जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या यंत्रणा सक्षम करण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याची मागणी राज्य शासन आणि महापालिकेकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर बाळासाहेब वारुळे, हनीफ शेख, अँड. शाम आसावा,प्रवीण मुत्याल, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, अनिल गावडे, राहुल कांबळे, साहेबराव अरुने, धीरज शिंदे, डॉ. गिरीश कुलकर्णी, नाना बरसे, नाना भोरे, अजित कुलकर्णी, अजित माने, सीमा गंगावणे, सचिन ढोरमले, वैजनाथ लोहार, शिल्पा केदारी आदींच्या सह्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.