मनपाने साधा सतर्कतेचा इशारादेखील शहरवासियांना दिला नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरामध्ये अनेक भागात शनिवारी रात्रीपासून ते काल रविवार सायंकाळपर्यंत पावसाने संपूर्ण नगर शहर जलमय झाले होते. आपत्कालीनकरिता जी यंत्र सामुग्री पाहिजे ती सुद्धा मनपा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. हवामान खात्याकडून दोन दिवस सतत पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. परंतु, याचीदेखील साधी दखल मनपा प्रशासनाकडून घेण्यात आली नाही व तसा इशाराही शहरवासियांना दिला नाही, अशी माहिती पत्राद्वारे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली आहे.

महापालिकेने आपत्कालीन समिती नेमलेली आहे. मनपा प्रशासनाने आपत्कालीन विभागप्रमुखांची पुस्तकं तयार करून सर्व नगरसेवकांना देण्यात आली होती. परंतु, त्यापैकी एकाचाही फोन लागत नव्हता व ते अस्तित्वातच नाही. याकरिता मनपाने बजेटमध्ये तरतूददेखील केलेली आहे.शहरातील नागरिकांची अचानकपणे धावपळ उडाली. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन काही उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित नागरिकांचे हाल झाले नसते.

प्रभाग 14 मध्ये मनपाचे घनकचरा व्यवस्थापनचे अधिकारी डॉ. पैठणकर हे आले असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती स्वतः पाहिली. सिद्धार्थनगर येथील अण्णा भाऊ साठे झोपडपट्टी व परिसर या ठिकाणी मोठा पावसाळी नाला असून, त्याचीही साफसफाई झालेली नाही व केलीच नाही. यामुळेही येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या झोपडीमध्ये नाल्यातील पाणी शिरले व ते पाणी अजूनही तसेच आहे. तसेच, महावीरनगर हॉटेल ओबेरॉय मागील बाजूस मोठा ओढा आहे. पूर्ण नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होता. पावसाळी नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी शिरले होते. 

जेवढी तातडीची खबरदारी घ्यायला पाहिजे तेवढी घेतली गेली नाही. आपत्कालीन विभागाकडे जेसीबी, पोकलेन, अग्निशामक दलाचे वाहन, ऍम्ब्युलन्स, औषधोपचार यंत्रणेबरोबरच आपत्कालीन समितीच्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक असलेली यंत्रसामुग्री यापैकी कुठलीही व्यवस्था कर्मचाऱ्यांकडे दोन दिवस उपलब्ध झाली नाही.

महापालिकेचे दोन उपायुक्‍त, एक अतिरिक्‍त उपायुक्‍त, चार झोन विभागप्रमुख व इतर अधिकारी या सर्वांचे फोन बंद होते. यापैकी एकाचाही नंबर गेली दोन दिवस लागला नाही व ते उपलब्धही नव्हते. त्यांच्या आपत्कालीन ड्युटी असताना त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही मग त्यांचा उपयोग काय ? मनपाने साधा सतर्कतेचा इशारादेखील शहरवासियांना दिला नाही. 

आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक कळविला नाही, पूरस्थितीजवळील नागरिकांना सुखरूप ठिकाणी हलविण्याची देखील मनपाकडे यंत्रणा नाही. अण्णा भाऊ साठे चौक, स्वास्थ्य हॉस्पिटलजवळ लहान मुलांच्या शाळा असून, त्याठिकाणी देखील तीन ते चार फूट पाणी साचते याचीदेखील दखल प्रशासनाने घेतली नाही. 

बागरोजा हडको, नीलक्रांती चौक व दिल्लीगेट येथील महत्त्वाच्या ठिकाणी जमिनीच्या आतून पाइपलाइन केली असूनही रस्त्यावरून पाणी का वाहत होते? याची कोणी दखल घ्यावी. त्यांच्यावर कुठेतरी कारवाई केली पाहिजे. निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर व अनेकांचे संसार वाहून गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? अशी परिस्थिती असताना प्रशासनाला जाग येईल का व जाग आलीच तर याची दखल घेईल का? उद्‌भवलेल्या संपूर्ण प्रसंगाची जबाबदारी ही प्रशासनाची असून त्यांनी वेळीच दखल घेतली पाहिजे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.