मैत्रीत गरीब, श्रीमंत भेदभाव नसावा : हेमलताजी शास्त्री

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मैत्री म्हणजे जगातील सर्वात निस्वार्थी असे नाते आहे. मैत्री करताना व ती टिकवताना मित्र गरीब आहे की श्रीमंत याला महत्त्व नसते. मैत्री कशी असावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री होय. गरीब सुदामाचे कच्चे पोहे खावून भगवान श्रीकृष्णाने आपल्या या बालमित्राला न मागता सर्व काही दिले. अशी मैत्री आजच्या काळात दुर्मिळ आहे. मैत्रीत गरीब, श्रीमंत असा भेद कधीच नसावा, असे विचार वृंदावन मथुरा येथील राष्ट्रीय संत हेमलताजी शास्त्री यांनी मांडले. 


नगरमधील जाधव परिवार व नंदनवन उद्योग समूह आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची शनिवारी सांगता झाली. सांगतेप्रसंगी हेमलताजी यांनी सुदामा कथा व शुकदेव विदाई कथेचे निरुपण केले. कथेचा शेवट करताना त्यांनी भक्त व भगवंताच्या नात्यांवरील भजने सादर केली. ‘धावुनी ये विठ्ठला सत्वरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी’ असे मराठमोळे भजन सादर करुन त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. 

यावेळी बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव, संजय जाधव, दत्ता जाधव, डॉ.अमोल जाधव, नंदलाल मणियार, मगनशेठ पटेल, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, पंडित विजयशंकर मिश्रा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथा निरुपणावेळी मार्गदर्शन करताना हेमलताजी शास्त्री म्हणाल्या की, आयुष्यात कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते. 

आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. राजसूय यज्ञावेळी भगवान श्रीकृष्णांना पांडवांनी अग्रपूजेचा मान दिला. या मानसन्मानानंतरही श्रीकृष्णांनी यज्ञ सोहळ्यात योगदान म्हणून पत्रावळ्या उचलण्याचे काम केले. कोणतेही काम लहान नसते त्यात भक्तीभाव पाहिजे, अशीची शिकवण भगवान श्रीकृष्णांनी कृतीतून दिली. आज समाजात मर्यादा उल्लंघन होत असल्याने मोठे दुष्परिणाम पहायला मिळत आहे. 

सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडली व रामायण घडले. आजच्या मुली, युवतींनी अशी मर्यादेची लक्ष्मण रेषा कधीही ओलांडू नये. मुलींना सौंदर्य खुलवणारा शृंगार करायला शिकवा, मात्र त्यांना अश्‍लिलता पसरवणार्‍या आधुनिक फॅशनपासून दूर ठेवा. पुर्वीच्या काळात शेती उत्पादन कमी असले तरी कोणी उपाशी राहत नव्हते. त्यावेळी देण्याची दानत असलेले लोक होते. आजकाल तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन वाढले आहे. तरीही देशात अनेक लोक एक वेळच्या अन्नासाठी तडङ्खडत असतात. 

कपड्यांचा उद्योग कित्येक पटीने वाढला आहे. तरीही गरीबांना पुरेसे कपडे मिळत नाही. श्रीमंत वर्गातही छोटे कपडे घालून अंगप्रदर्शनाची ङ्खॅशन आली आहे. घरांचा आकार मोठा झाला. परंतु, तरीही या मोठ्या घरांमध्ये वृध्द मातापित्यांना जागा देण्याची मानसिकता नसते. परिणामी वृध्दाश्रमही वाढत आहेत. हे थांबण्यासाठी सदाचार, सद्विचारांशिवार्य गत्यंतर नाही. धार्मिक सोहळ्यात देण्यात येणारे ज्ञान प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणले पाहिजे. 

रामायण, महाभारत, गीता हे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दर्शवतात. या मार्गावरुन गेल्यास भगवंताची प्राप्ती निश्‍चितच होईल. अखेरच्या दिवशी बोलताना हेमलताजी शास्त्री यांनी नगरकर भाविकांच्या धार्मिकतेचे विशेष कौतुक केले. नेट्नया संयोजनाबद्दल त्यांनी जाधव परिवार व नंदनवन उद्योग समूहाला शुभेच्छापर आशिर्वाद दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.