बारमालकांसाठी पुन्हा गुप्त बैठकांना आला जोर, शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा पुढाकार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बारमालकांना अभय देण्यासाठी शहरातून जाणारे महामार्ग महापालिके कडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. हे महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव महासभे समोर ठेवावा, यासाठी काही नगरसेवकांनी महापौरांना पत्रं दिली आहेत. त्यासाठी सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून जाणारे हे महामार्ग महापालिके कडे हस्तांतरित झाल्यास शहरातील शेकडो बार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेले सर्व बार, वाईन शॉप, बिअर शॉपी, तसेच देशी दारूची दुकाने बंद करण्याचे सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश आहेत. एप्रिलपासून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने शहरातील शेकडो बारना टाळे लागले आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी शहरातून जाणारे सहा राज्य महामार्ग एक राष्ट्रीय महामार्ग असे सात महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वत:कडे हस्तांतरित करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी बारमालक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकांना वेग आला आहे. महामार्ग स्वत:कडे हस्तांतरित करण्याचा ठराव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवावा, अशा मागणीचे पत्र काही नगरसेवकांनी महापौर सुरेखा कदम यांना दिले आहे. नगरसेवकांनी असे पत्र द्यावे, यासाठी सेनेच्याच एका पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला आहे. महामार्ग स्वत:च्या ताब्यात घ्यावेत, असा प्रस्ताव वर्षभरापूर्वीच महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

महामार्गालगत असलेल्या बांधकामांमुळे अतिक्रमणांचा प्रश्न िनर्माण झाला आहे. महामार्गांलगत बांधकाम करताना ३७ मीटर सोडून बांधकाम करावे लागते. त्यामुळे नवीन बांधकामांसाठी परवानगी घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातून जाणारे सर्व महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. 

या महामार्गांना आता पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्व महामार्ग वर्गीकृत करावेत, तसे झाल्यास महामार्गांलगत बांधकाम करताना केवळ साडेचार फूट जागा सोडावी लागेल, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु तेव्हाचे विरोधक आता सत्तेत असलेल्या अनेक नगरसेवकांनी महामार्गांच्या देखभाल, दुरूस्तीच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत या प्रस्तावास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. परंतु आता हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेसमोर मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे.

शहरात १० वाईन शॉप बार सुरू
शहरातील सुमारे ९५ टक्के बारना टाळे लागले असले, तरी काही बार बिअर शॉपी शहराच्या अातील बाजूस असल्याने ते कारवाईतून बचावले आहेत. या बारमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित ९० ते ९५ बार, वाईन शॉपी मात्र गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. महापालिकेने शहरातून जाणारे महामार्ग स्वत:च्या ताब्यात घेतल्यास हे बार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

बारमालकांचा व्यवसाय ठप्प
सर्वाेच्चन्यायालयाच्या आदेशानुसार शहर जिल्ह्यातील ७०७ परमिट रूम, वाईन शॉप बिअर शॉपी एप्रिलपासून बंद करण्यात आल्या. त्यात शहरातील ९५ टक्के परमिट रूमचा समावेश आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे बार मालकांचा व्यवयाय ठप्प झाला आहे. बार बंद झाल्याने शहर जिल्ह्यातून मिळणारा तब्बल २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

राज्य सरकारची अंतिम मंजुरी आवश्यक
मनमाड, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कल्याण-निर्मल, बीड हे शहर हद्दीतून जाणारे महामार्ग वर्गीकृत झाल्यास अतिक्रमणांचा प्रश्न सुटेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. हे महामार्ग वर्गीकृत करण्याचा ठराव महासभेत मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. त्यानंतरच शहर हद्दीतून जाणारे हे महामार्ग वर्गीकृत होऊन बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे परवाने
एकूण परवाने - ८२५
परमिटरूम - ४९४
वाईन शाॅप - ३१
बिअरशॉपी - ११२
देशी दारूची दुकाने - ७०

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.