श्रीरामपूर पालिकेची बैठक दोन मिनिटांत आटोपली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पालिका सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत असतानाच महायुतीतील अंतर्गत कलहाने डोके वर काढले आहे. त्यातच आज आयोजित मासिक बैठकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यतेने सत्ताधाऱ्यांनी आवश्यक कोरमपूर्ण करत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली आणि सुरू होण्यापूर्वीच दोन मिनिटात बैठक आटोपल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या गेल्या. 


त्यानंतर ससाणे गटाकडून विकास कामे ठप्प झाल्याने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर करण्यात आले, तर सत्ताधारी गटाने अंतर्गत कलहाची कबुली देत नगराध्यक्षांमागे उभे राहत विकास कामे सुरू असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पालिकेची सभा दोन मिनिटांत आटोपल्यानंतर सत्ताधारी गटाच्या वतीने व त्यानंतर बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर करत विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. गेल्यावेळच्या बैठकीत दैनंदिन वसुलीवरून चांगले रणकंदन झाले. 

अनेक खुलासे करत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. उपनगराध्यक्ष करण ससाणे व नगरसेवक दिलीप नागरे यांनी महायुतीसाठी पुढाकार घेणारे भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांनी आरक्षण उठवत ३५ कोटींचा फायदा करून घेत असल्याचा आरोप केला. एवढ्यावरती न थांबता त्यांनी पालिकेत शॅडो नगराध्यक्ष नेमण्यात आल्याचा आरोप केला आहे. याचा संदर्भ देत राज्यात आदर्श पालिका म्हणून नावलौकिक असताना गेल्या दहा महिन्यांत विकास कामे ठप्प झाली आहेत. 

तीन-तीन महिने पालिकेच्या दवाखान्याला वैद्यकीय अधिकारी नाही, कामगारांचे पगार थकतात, ज्या रस्त्यावरून सात हजार विद्यार्थी प्रवास करताना त्याचेही काम करू शकत नाही, 'शॅडो नगराध्यक्षां'च्या माध्यमातून सहा महिन्यांत ३५ कोटींचा फायदा होत असेल तर २०-२० वर्षे नगरसेवकपद भूषविणाऱ्यांकडे लोक संशयाने बघायला लागले आहेत. या सर्वांशी काँग्रेस पक्षाच्या नगररसेवकांचा कोणताही संबंध नाही. 

सत्ताधाऱ्यांच्या पापात सहभागी व्हायचे नाही, म्हणून आजच्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आरक्षण उठविण्याच्या ठरावावर मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी कायदेशीरबाब तपासणार असल्याचे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी सांगितले.

पालिका बैठकीला सत्ताधारी गटाचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक, श्यामलिंग शिंदे, अंजुम शेख, बाळासाहेब गांगड, राजेंद्र पवार, संतोेष कांबळे, ताराचंद रणदिवे, जितेंद्र छाजेड, समीना शेख, निलोफर शेख, रजियाबी जहागीरदार, अक्सा पटेल, हेमा गुलाटी, जायदाबी शेख, स्नेहल खोरे आदी उपस्थित होते. भारती कांबळे, दीपक चव्हाण, प्रणिती चव्हाण, शीतल गवारे, रवी पाटील, किरण लुणीया, प्रकाश ढोकणे आदी गैरहजर होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.