शिरसगावला वृद्ध दाम्पत्यास लुटले सोन्या-चांदीसह दोन लाखांचा मुद्देमाल लांबविला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरसगाव हद्दीत हनुमानमंदिराजवळ इंदिरानगर येथे अज्ञात चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवित लुटल्याची घटना गुरुवारी (दि. १७) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी दहा तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख सहा हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. यात वृद्ध किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, यावेळी चोरट्यांनी मद्यप्राशन करत घरातील खाद्यपदार्थांवरही ताव मारला. तसेच जाधव यांच्या कोपरीत ठेवलेले एक लाख रूपये कोपरी पलंगा खाली पडलेली असल्याने वाचले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रामराव उमाजी जाधव (वय ७०) हे आपल्या पत्नी शकुंतला यांच्यासह शिरसगाव हद्दीत हनुमान मंदिराजवळ इंदिरानगर याठिकाणी राहतात. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस असलेला दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर साखर झोपेत असलेल्या जाधव दाम्पत्याला त्याच कटावणी व चाकूचा धाक दाखवून धमकावले. जाधव यांच्याकडे कपाटच्या चावीची मागणी केली असता चाव्या मुलाकडे असल्याचे त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले.

त्यानंतर त्यांनी कटावणीच्या सहाय्याने कपाट उघडून त्यातील सोने, चांदीचे दागिने व रोख सहा हजार रुपयांचा ऐवज घेतला. त्यानंतर रामराव जाधव यांच्या उजव्या खांद्यावर कटावणी मारले असता शकुंतला जाधव यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून दिले. दरम्यान, चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. चोरी करण्यापूर्वी घराच्या मागील बाजूस घरातून पाणी घेऊन मद्यपान केले, गुटखा खाल्ला, तसेच फ्रिजमधून काही पदार्थ खाण्यासाठी नेले होते.

चोरी केल्यानंतर वृद्ध दाम्पत्यास बसवून ठेवत स्वयंपाक घरातून पाणी घेतले व तेथेच शिल्लक असलेली दारू पिली. सोबत फ्रिजमधील सफरचंद व काही पदार्थ खाले. त्यानंतर दरवाजा बंद लावून पसार झाले. घटनेची माहिती समजताच माजी सरपंच अण्णासाहेब गवारे यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. 

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, पो.हे.कॉ. हापसे, कोळपे, जादव, जोसेफ साळवे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. त्यानंतर नगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधी पाटील वेठेकर, शंकर चौधरी, ठोंबरे याठिकाणी दाखल झाले. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यावरूनच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गु.र.नं. २१२/१७, भा.दं.वि. कलम ३९४, ४५२, ३४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक पी. के. शेवाळे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.