श्रीगोंद्यातील गोरक्षकांवर हल्यातील आरोपींना माजीमंत्री पाचपुतेंचे पाठबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा येथे दि.५ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्याच्या आवारात गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला झाला. या घटनेतील मुख्य आरोपी अतिक कुरेशी व इतरांना माजी गृहमंत्री बबनराव पाचपुते यांचे पाठबळ आहे, असा आरोप अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला. 


 
पाचपुते यांच्यावर कारवाई व्हावी, अतिक कुरेशीविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी तसेच गोरक्षकांना संरक्षण द्यावे, गोवंशाची अवैध खरेदी-विक्री बंद व्हावी, या मागणीसाठी सोमवारी {दि.१४} जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.

यावेळी गोसेवा प्रतिष्ठानचे युवा संदीप खामकर, शिवशंकर स्वामी, नितीन शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे आदींसह गोरक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकबोटे म्हणाले, सोमवारच्या मोर्चात सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार असून हा मोर्चा सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. 

श्रीगोंदा येथील घटनेसंदर्भात बोलतांना ते म्हणाले, की दि. ५ ऑगस्ट रोजी गोरक्षणाच्या कारवाईसाठी गोरक्ष श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पशु बाजारात गेले होते. त्यांनी कत्तलीसाठी जाणारे १० बैल, २ गायी पकडल्या. ही जनावरे पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे नेण्यात येत असतांना आवारातच श्रीगोंदा येथील समाजकंटक अतिक कुरेशी व त्याच्या साथीदारांनी गोरक्षांवर प्राणघातक हल्ला केला. 

यात ५ ते ६ गोरक्ष जखमी झाले. या घटनेच्यावेळी पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. मात्र त्यांनी कुरेशींबरोबर असलेल्या संबंधामुळे घटनासथळावरून पळ काढला. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करावी. 

आरोपींना बबनराव पाचपुते आणि पोलिसांचे पाठबळ
या घटनेतील सर्व आरोपींना बबनराव पाचपुते आणि पोलिसांचे पाठबळ आहे. त्यामुळेच ते पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालू शकले. पाचपुते यांनी या आरोपींना रसद पुरविली. पाचपुते हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून आरोपी व पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध आहेत, असा आरोप एकबोटे यांनी केला. 

पोलीस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणाची चौकशी
ते पुढे म्हणाले, की श्रीगोंद्यातीलच नव्हे तर नगर जिल्ह्यातील सर्व कसायांकडे अमाप संपत्ती आहे. त्या संपत्तीचीही चौकशी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना फोन करून गोरक्षांच्या संरक्षणाची मागणी केली होती. असे असतांनाही शिवशंकर स्वामी यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांना पूर्वकल्पना देऊनही ही घटना घडल्याने पोलीस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणाची चौकशी करावी. 

गोरक्षकांना पोलीस संरक्षण देणे, हे शासनाचे आद्य कर्तव्य
गोवंशांची कत्तल करणारे गोमाफिया देशद्रोही कारवायांसाठी संबंधित आहेत. त्यामुळे गोरक्षकांना पोलीस संरक्षण देणे, हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. श्रीगोंद्यातील घटनेत २३ आरोपींची नावे असतांना मुख्य आरोपी अतिक कुरेशी पोलिसांसमोरून निघून गेला, या घटनेत केवळ ९ आरोपींनाच अटक केलेली आहे. ही कारवाई दाखविण्यापुरतीच आहे, असेही एकबोटे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.