सेंट्रल बॅंकेच्या शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची हेळसांड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सेंट्रल बॅंक या राष्ट्रियकृत बॅंकेच्या शाखेत गेल्या दीड वर्षांपासून शाखा व्यवस्थापकाचे पद रिक्त असून कर्मचारीही कमी असल्याने नागरिकांची अर्थिक कामांसाठी मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे, बॅंकेत शाखा व्यवस्थापक व आवश्यक कर्मचारी नियुक्त करून बॅंकेचा कारभार सुरळीत करून ग्राहकांना दिलासा द्यावा अन्यथा कोणतीही पुर्व सूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रिय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांनी दिला आहे.


रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन शहरटाकळी येथील सेंट्रल बॅंकचे प्रभारी शाखाधिकारी काळे यांना दिले. निवेदनात म्हंटले आहे की, शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने पंचक्रोशीतील 16 गावांतील ग्राहक, विविध व्यावसायिक , शेतकरी व विद्यार्थ्यांची विविध अर्थिक कामे खोळंबली आहेत. या बॅंकेचे एटीएम अनेक दिवसांपासून कॅश अभावी बंद असल्याने एटीएम मशीन म्हणजे शोभेची वस्तू झाल्यासारखे झाले आहे. 

ग्राहकांना खात्यातील रक्कम काढण्यासाठी तीन ते चार तास ताटकळत प्रतिक्षा करावी लागते. विशेषतः शेतक-यांना व मजूरांना कामाला दांडी मारूनच बॅंकेचे काम करावे लागते. शालेय विद्यार्थ्यांची विविध शिष्यवृत्ती व गणवेश रक्कमेसाठीची नवीन खाते उघडण्याच्या प्रक्रियाही वेळेत होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. राज्यशासनाने जाहीर केलेल्या शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल बॅंकेतील कर्मचा-यांना विचारले असता काहीच सांगत नाहीत. थकीत कर्जदारांना 10 हजार रूपये पिक खर्चासाठी देण्याचे शासनाने जाहीर केले. परंतु, त्याबाबत कोणतीही कार्यवाही बॅंकेमार्फत करण्यात आलेली नाही. 

राज्यशासनाच्या कर्जमाफीत जे शेतकरी लाभार्थी आहेत, त्यांची नावे बॅंकेने जाहीर करावी , अशी शेतक-यांची मागणी असून कर्जमाफी योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकरी विचारणा करीत आहेत. अनेक गरजू लाभार्थींचे , व्यावसायिकांचे कर्जाचे प्रस्ताव वेळेत मंजूर केले जात नाहीत. गर्दी आहे नंतर या असे उत्तर देऊन कर्जाची मागणी करणा-यांना हेलपाटे मारावे लागत आहे. 

त्यामुळे, बॅंकेत रिक्त असलेले शाखा व्यवस्थापक पद व आवश्यक कर्मचारी तातडीने नियुक्त करण्याची मागणी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांच्यासह आबासाहेब राऊत, दत्ता गवळी, सोमनाथ अडकिते, संतोष भालके, नंदू मुके, देविदास शिरसाठ, भागचंद कुंडकर, प्रकाश वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.