राजकारणापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे - राजश्री घुले.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारणापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे, अशी घुले घराण्याची धारणा असल्याने या परिसराचे कोणतेही काम अडणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी दिली.

निधींचा श्रोत आपल्या हाती नव्हता, त्यामुळे मध्यंतरीच्या काळात येथील विकासकामे खुंटली होती. आपण मला जिल्हा परिषदेत पाठविले असल्याने आता मात्र सर्व अनुशेष भरून काढले जातील याची हमी देते. हा अनुशेष भरून काढण्याबाबत मला घरातूनच तंबी मिळाल्याचे स्पष्ट करून हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यातील 300 नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या व्यक्‍तिमत्त्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. येथील श्रमशक्‍ती इमारत बांधकाम कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दिलीप लांडे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी असो की, बांधकाम कामगारांचे अर्ज भरणे असो सर्वत्र जाचक अटी घातल्याने सरकारचा चांगलाच समाचार घेतला. माणसाची ओळख नसणारे सध्याचे सरकार आहे. एका हाताने द्यायचे दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी त्यांची रीत आहे. श्रीमंतांच्या थैलीपेक्षा गरीबाचे आशीर्वाद मोठे असतात म्हणून ग्रामीण भागाचा कणा मजबूत ठेवण्यासाठी आपल्या एकतेची वज्रमूठ मजबूत ठेवा, असे आवाहन करून आपण एकदा केलेली चूक सुधारण्याचा निश्‍चय करूया, असे ते म्हणाले.

बाजार समितीचे सभापती राजपुरे यांनी येथील प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नसल्याने रब्बीचे अनुदान दोन महिन्यांपासून वाटपाशिवाय पडले असून, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा योग्य तो प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. अशोक उगल मुगले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र पानकर यांनी, तर पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी नेमाणे यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.