संगमनेर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास धांदरफळ येथे बिबट्याने अंधारात पिता-पुत्रावर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. 


यावेळी बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावरही हल्ला केला. या हल्ल्यात तीन मेंढ्या ठार केल्या आहेत. निमगाव खुर्द या ठिकाणी तीन शेळ्या तर समनापूर शिवारात पाच शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत माहिती अशी की, धांदरफळ याठिकाणी साहेबराव म्हस्कुले व राजेंद्र म्हस्कुले हे पिता-पुत्र राहत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपले मेंढ्या व शेळ्या चारुन संध्याकाळी घरी आले होते.मेंढ्या-शेळ्या घरासमोर बांधल्या होत्या. पहाटेच्या दरम्यान बिबट्याने अचानक मेंढ्यांवर हल्ला केला. 

मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने हे दोघे जण झोपेतून जागे झाले. मेंढ्यांकडे धाव घेतली असता त्यांच्यावरही अंधारात बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निमगाव खुर्द याही ठिकाणी बाळासाहेब कासार या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. 

त्यानंतर समनापूर शिवारातील निंबाळे रस्त्यालगत असणाऱ्या पोपट कारभारी शरमाळे या शेतकऱ्याची एक व रामदास कारभारी शरमाळे या शेतकऱ्याच्या चार शेळ्या अशा एकूण सगळ्या आठ शेळ्या व तीन मेंढया बिबट्याने ठार केल्या आहेत. बिबट्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस समनापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, पिंपरणे, धांदरफळ आदी गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. 

दिवसाढवळ्याही बिबटे शेळ्यांवर हल्ले करु लागले आहेत. त्याचबरोबर रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.