विखे यांना मुख्यमंत्र्याच्या मैत्रीचा फायदा काय ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साई संस्थानकडून 500 कोटी रुपये निधी देण्याची केवळ पोकळ घोषणा केली. प्रत्यक्षात अजून एक रुपयादेखील या कामी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे जनतेला केवळ दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

विरोधी पक्षनेते विखे यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांत थोरात हे खो घालत असल्याची टीका केली होती. त्याचा आमदार थोरात यांनी समाचार घेतला.विखे यांना मुख्यमंत्र्याच्या मैत्रीचा फायदा काय अशा शब्दात आमदार बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांची खिल्ली उडविली आहे.

ते म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करुन आपण निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले. उजव्या व डाव्या कालव्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कालव्यांसाठी साई संस्थानच्या निधी घोषणा केली.

विखे यांनी निळवंडे धरण कालव्यांबाबत केलेल्या चुकीच्या वृत्ताचे खंडन करताना आमदार थोरात म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करुन आपण निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले. या कामी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न निर्माण केला.

कौठे कमळेश्‍वर, पिंपळगांव कोंझीरा, गणेशवाडी यांसह मोठ मोठ्या बोगद्यांची कामे पूर्ण करताना कालव्यांची काही कामे ही पूर्ण केली. परंतु उर्वरीत कामांसाठी भाजप सरकारने मागील 3 वर्षात अतिशय तुटपुंजा निधी दिला. या वाढीव निधी मागणीसाठी आपण कोणतीही प्रसिध्दी न करता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.

डावा व उजवा कालवा लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आपली तळमळ व जीवनाचा ध्यास आहे. यासाठी लाभक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी निळवंडेच्या कालव्यांसाठी जास्तीत जास्त निधी मिळून हे कालवे लवकरात लवकर पूर्ण करावे अशा एकमुखी मागणीचे ठराव शासनाकडे पाठविले आहेत.

निधी देवू नका असा कुणी ठराव करेल का? या निधीसाठी सरकारकडे मागणी करायचे सोडून जनतेची दिशाभूल करताना निळवंडे धरणाचे काम, कालवे, त्यांच्या निधीसाठी पाठपुरावा याची काहीही माहिती नसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी चुकीचे वक्तव्य करुन दुष्काळग्रस्तांची अवहेलना केली असल्याचा टोला ही आमदार थोरात यांनी लगवला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.