सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात करू नये- आ.बाळासाहेब थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पण आता कुठे तरी कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात करु नये असे सांगून विधानसभेची निवडणूक संपली तर पठार भागाच्या पाठीमागे तालुक्यातील सर्व संस्था भक्कमपणे उभ्या असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आ.थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तर व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, जि.प.कृषी सभापती अजय फटांगरे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रगतशील शेतकरी आनंदा गाडेकर, माजी पंचायत समिती सदस्य बापूसाहेब जाधव, दुध संघाचे माजी व्हा.चेअरमन सुभाष आहेर, युवा नेते इंद्रजीत खेमनर, सामाजिक कार्यकर्ते सुहास वाळुंज, तुळशीनाथ भोर, सुनंदाताई भागवत, भाग्यश्री नरवडे, संपतराव आभाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, घरे फोडण्याचे काम आपण कधीच केले नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेवून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. त्याचबरोबर आता पठार भागाच्याही विकासाची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचेही पठार भागाच्या विकासासाठी सहकार्य होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत थोडी फार गडबडही झाली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी झाली. पण त्यावेळी असे कुठलेच फॉर्म भरुन घेतले नाही. कुठेही अवघड प्रक्रिया न राबवता सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती. पण सध्याच्या सरकारने जी कर्जमाफी केली ती अतिशय अवघड प्रक्रिया आहे. पुन्हा आता ते मतं मागण्यासाठी फिरतील. त्यांना फसू नका असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आ.डॉ.तांबे, ॲड.कानवडे, अजय फटांगरे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार भरत जाधव यांनी मानले. यावेळी पठार भागातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सोसायटींचे चेअरमन, व्हा.चेअरमन, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.