कोटींचा मालक सांगणारा लाखोंचा चुना लावून पळाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी येथील पाण्याच्या टाकी परिसरातील एका लहान मुलांच्या हॉस्पिटललगत साईबाबांच्या नावाने असलेल्या बिल्डिंगमध्ये भाड्याने सहा महिन्यांपासून राहात असलेल्या एका व्यक्तीने आजूबाजूच्या रहिवासी, नागरिक, दुकानदार व काही सावकारांनाही लाखो रूपयांना चुना लावत शुक्रवारी (दि. ११) पहाटे पलायन केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

राहुरी शहरातील पाण्याची टाकी परिसरात एका लहान मुलांच्या हॉस्पिटललगत साईबाबांच्या नावाने असलेल्या एका बिल्डिंगमध्ये ४५ वर्षे वयाची एक व्यक्ती पत्नी व त्यांची तीन मुलांसमवेत सहा महिन्यांपासून राहात होते. सर्वात मोठा मुलगा २२ वर्षांचा असून तो मुलांना नृत्य शिकविण्याचे काम करत होता. दुसरा मुलगा १८ वर्षांचा व तिसरा ६ वर्षांचा असल्याचे समजते.

दोन वर्षांच्या कालावधीत संबंधित व्यक्तीचे वास्तव्य पुणे येथे होते व आठवड्यातून एकदाच तो राहुरी येथे आपल्या कुटुंबाकडे येत असायचा. या काळात आजूबाजूचे किराणा दुकानदार, दुधवाले, घरमालक, मुलांच्या शाळेचे संस्थाचालक आदींशी त्याने व कुटुंबाने घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते. 

श्रीरामपूर, पुणे, लोणावळा आदी ठिकाणी आमची स्थायिक स्वरूपाची संपत्ती असल्याचे ते सांगत होते. दरम्यानच्या काळात या व्यक्तीने राहुरीतील काही सावकारांकडून लाखो रुपये व्याजाने घेतले होते. तसेच आजूबाजूच्या दोन शेजाऱ्यांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये घेतले. 

जवळच असलेल्या किराणा दुकानदाराचीही सुमारे १० हजार रुपये बाकी थकवली होती. दुधवाल्याचेही पाच हजार रुपये थकवले असून ज्या फ्लॅटमध्ये तो राहात होता, त्याचेही चार-पाच महिन्यांचे भाडे थकविलेले आहे. त्यामुळे एकूण कर्जाचा आकडा काही लाखांत गेल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने शुक्रवारी (दि. ११) पहाटे ५ ते ६ या वेळेत घरातील सर्व सामान टेम्पोमध्ये भरून कुटुंबासह पलायन केल्याचे आता उघड झाले आहे. 

या व्यक्तीने व कुटुंबाने अजून कुणाकुणाला गंडा घातला आहे, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. घर बदलण्यापूर्वी चार दिवस अगोदर आम्ही जवळच दुसरा फ्लॅट चार हजार रुपये महिना भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहायला जाणार असल्याचे शेजाऱ्यांना सांगून ठेवले होते. 

तसेच ज्या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणची स्वच्छताही करून ठेवली होती. त्यामुळे सामान घेऊन जाताना शेजाऱ्यांना हे कुटूंब त्याचठिकाणी जात असल्याचे वाटल्याने कुणीही विचारणा केली नाही; परंतु सकाळी हे कुटूंब इकडेही नाही आणि तिकडेही नाही, हे समजल्यावर शेजारी एकमेकांशी बोलते झाले. या व्यक्तीचे राहुरीतील एकूण वास्तव्य दोन वर्षे होते. 

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला व्यक्तीच्या संबंधित शिक्षण संस्थेत त्याची दोन मुले शिक्षण घेत होती. या महिलेची सुमारे एक लाख रुपये बाकी त्याच्याकडे आहे, अशीही माहिती समजली आहे. संबंधित व्यक्ती कुटुंबासह गायब झाल्याने त्या व्यक्तीने अंदाजे १५ लाखांच्या वर गंडा घातला असल्याची माहिती समजली आहे; मात्र याबाबत अद्याप पोलीस ठाण्याला कोणीही या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.