चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून, बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव उघड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथील सुनीता प्रसाद आढाव या विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरुन व तिला मुळबाळ होत नसल्याच्या कारणावरुन डोक्यावर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पती प्रसाद सोन्याबापू आढाव याच्या विरोधात खूनाचा व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
संजय भाऊसाहेब आसने रा. माळवाडगाव ता. श्रीरामपूर यांनी त्यांच्या बहीणीच्या खूनाची फिर्याद राहुरी पोलिस स्टेशनला दाखल केली. ३६ वर्षीय सुनीता आढाव हिस मुळबाळ नव्हते. तिच्या चारित्र्यावर तिचा पती प्रसाद संशय घेत असे. शेळ्या व गायीसाठी गवत घेण्यासाठी रानात काल सायंकाळी साडेसहाचे सुमारास गेली होती. त्यावेळी पाठीमागून लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला. 

त्यात रक्तस्त्राव झाल्याने ती मृत्यूमुखी पडली. सायंकाळी शेतात गेली ती परत घरी का आली नाही याची शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी शेजारच्या उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. सुरूवातीला बिबट्याने हल्ला केल्याने ती त्यात ठार झाली असे भासविण्याचा प्रयत्न झाला. मात्र घटनास्थळी एक रक्ताने माखलेला लाकडी दांडका आढळला. तसेच मृतदेह चिक्कूच्या शेतातून उसाच्या शेतात फरपटत आणल्याच्या खुना आढळल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्याही लक्षात आले. 

विशेष म्हणजे प्रेताच्या उत्तरीय तपासणीत कोठेही मृतदेहावर बिबट्याच्या हल्ल्याच्या खूना आढळल्या नाहीत. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व उपनिरीक्षक सविता सदावर्ते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी ही रात्री घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकास पाचारण केले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.