जन्मदात्या आईचा गळा दाबून खून ; मुलाला जन्मठेपेची शिक्षा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जमीन वाटून देण्याच्या कारणावरुन जन्मदात्या आईचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आरोपी युवराज केशव मांडवे (रा.पिंपरी गवळी, ता.पारनेर) याला दोषी धरुन जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथील आरोपी युवराज केशव मांडगे हा सैन्यामध्ये नोकरीला होता. तो ऑगस्ट २०१६ मध्ये सैन्यामधून रजा घेऊन गावी आला होता. आई ताराबाई केशव मांडगे हिच्या नावावरील आठ एकर जमीन वाटून द्यावी, अशी तो मागणी करीत होता.

आरोपी युवराज याला जितेंद्र केशव मांडगे हा भाऊ असून, तो पोलिस दलामध्ये नोकरीला आहे. जमीन वाटपाच्या कारणावरुन आरोपी युवराज मांडगे याने दि.१५ ऑगस्ट २०१६ रोजी आई ताराबाई हिच्याशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भांडण करून तिचा गळा दाबून खून केला. यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाल्याने मयत ताराबाईच्या मानेवर, चेहऱ्यावर जखमा होऊन त्यातून रक्त आले होते. ते रक्त मयत ताराबाई हिच्या कपड्याला तसेच आरोपी युवराज याच्या कपड्याला लागलेले होते. 

आरोपी युवराज याचा भाऊ जितेंद्र हा झेंडावंदन करून घरी आला, तेव्हा आई घरी नव्हती. त्याने भाऊ युवराज याला आई कुठे गेली, अशी विचारणा केली असता त्याने मला माहीत नाही, असे सांगून घराच्या पोर्चमध्ये बसून होता. दरम्यान जितेंद्र याने आईचा मित्राच्या मदतीने शोध घेतला असता आई घराच्या पाठीमागे मक्याच्या शेतात आढळून आली. त्यांनी आईचे प्रेत घराच्या पोर्चमध्ये आणून ठेवले असता, तेव्हाही आरोपी युवराज तेथेच बसून होता.

दरम्यान जितेंद्र मांडगे याने सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोसई एस.आर.गोरे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर झाली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध झाला नाही. 

सरकार पक्षाने परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर सादर केला. या आधारे न्यायालयाने आरोपी युवराज मांडगे याला दोषी धरुन भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड.विष्णूदास भोर्डे यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.