खून केल्याप्रकरणी पारनेच्या पाच जनांना जन्मठेप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन बाबाजी चिमाजी हुलावळे यांचा खून केल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांनी आरोपी बाळशीराम भागाजी वाफारे, भागाजी शिवराम वाफारे, ज्ञानदेव सोन्याबापू वाफारे, संतोष किसन वाफारे व नंदाबाई बाळशीराम वाफारे (सर्व रा.वाफारेवाडी, ता.पारनेर) यांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.आरोपी भागाजी वाफारे याच्या वयाचा विचार करता त्याला साध्या कैदेची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावली.या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि.३१ ऑक्टोबर २००६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पंधरा दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचे कारणावरुन मिटींग घेण्याबाबत आरोपी हे फिर्यादी जिजाबाई बाबाजी हुलावळे यांचे वस्तीवर आले. त्यावेळी फिर्यादी जिजाबाई आरोपींना म्हणाली, बाजीराव यानेच माझे मुलाला मारले, आता कशाची मिटींग घेता, यावरुन आरोपींनी फिर्यादी जिजाबाई हुलावळे व तिचे पती बाबाजी हुलावळे यांना शिवीगाळ केली. तसेच चौघा जणांनी बाबाजी याला डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केले.

यावेळी भांडण सोडविण्यास आलेल्या जिजाबाई व तिची मुले सतीष, मंगल यांनाही मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाबाजी हुलावळे यांना टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना बाबाजी हुलावळे याचा मृत्यू झाला. याबाबत जिजाबाई हुलावळे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पोसई मानगावकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांच्यासमोर झाली. यावेळी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, तिची मुलगी, वैद्यकीय अधिकारी, पोसई. राख, तपासी अंमलदार पोसई मानगावकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी बाळशीराम वाफारे, भागाजी वाफारे, ज्ञानदेव वाफारे, संतोष वाफारे आणि नंदाबाई वाफारे यांना जन्मठेपेची शिक्षा आणि विविध कलमान्वये ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

आरोपी भागाजी वाफारे याच्या वयाचा विचार करता त्याला साध्या कैदेची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड.अनिल घोडके यांनी काम पाहिले. त्यांना फिर्यादीतर्फे ॲड.पी.एस.गटणे यांनी मदत केली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकिल ॲड.सतीष पाटील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून सहा.फौजदार भोसले यांनी सहाय्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.