जिल्ह्यात खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बॉंबे नर्सिंग अँड क्‍लिनिक कायद्यासह पीसीपीएनडीटी (गर्भलिंग व प्रसवपूर्व निदान चाचणी) व एमटीपी (गर्भपात तंत्रज्ञान) यांच्या तरतुदीनुसार तसेच त्यातील अटी, शर्तींचा भंग करून मनमानी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी रुग्णालयांना आरोग्य विभागाने आता लगाम घालण्यास सुरूवात केली आहे. 


आरोग्य, महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्‍त पथकांनी नगर शहरासह जिल्ह्यात केलेल्या धडक तपासणी मोहिमेत 937 खासगी रुग्णालयात गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. या सर्वच रुग्णालयांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या असून 31 ऑगस्टपर्यंत सुधारण्याची डेडलाइन दिली आहे.

मार्च महिन्यात सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. याची राज्य शासनाने दखल घेवून रुग्णालयांची तपासणी करण्याची निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हास्तरावर आरोग्य, महसुल व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक स्थापन करण्यात आले होते. 

ही तपासणी मोहिम जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी, महापालिकेचे आरोग्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत नगर शहरासह जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 350 खासगी रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. त्यात 937 रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी रुग्णांवर बेतील अशी स्थिती काही रुग्णालयामध्ये आढळून आली आहे. 

रुग्णालयांची नोंदणी डॉक्‍टरांनी न करणे, वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावणे, प्रशिक्षित कर्मचारी नसणे, निवासी क्षेत्रात रुग्णालये उभारणे, आग प्रतिबंधकात्मक यंत्रणा नसणे, सोनाग्राफी संदर्भात तरतुदीचे पालन न करणे, गर्भपात संदर्भातील तरतूदी धाब्यावर बसविणे आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

या रुग्णालयांची तपासणी होत नसल्याने मनमानी पद्धतीने कारभार चालला होता. त्याला आता या धडक तपासणी मोहिमेमुळे लगाम बसणार आहे. नगर शहरात 291 क्‍लिनिक , 172 नर्सिंग होम, 98 सोनाग्राफी केंद्रे व 60 गर्भपात केंद्र या सर्वांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. 

याचा अर्थ नगर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी सर्वच कायदे धाब्यावर बसविल्याचे उघडकीस आले असून या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्रुटी असून हजारो रुपये बिले द्यावी लागली आहेत. गर्भपाताची 144 पैकी 74 केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. 875 बॉंबे नर्सिंग सेंटर पैकी 474 मध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याबरोबर नगर शहरासह जिल्ह्यातील 30 सोनोग्राफी केंद्रांच्या कारभारात अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने यांच्यावर विशेष लक्ष देण्याचे आदेश आरोग्य विभागाने येथील यंत्रणेला दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.