खून खटल्यात पती-पत्नीला जन्मठेप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :किरकोळ भांडणाचे कारणावरुन एकाचा डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांनी आरोपी सुरेश रंगनाथ शिंदे व आरोपी सविता सुरेश शिंदे (रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर) यांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि. २८/६/२०१५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांचे भांडणाचे कारणावरुन रेश्मा शिवाजी शिंदे व सविता सुरेश शिंदे यांच्यात भांडणे होती. तसेच दि. ३०/६/२०१५ रोजी सकाळी ६ वा. सुमारास फिर्यादी शिवाजी दिनकर शिंदे यांची आई वत्सलाबाई शिंदे या आरोपी सविता शिंदे यांचे घरासमोरुन जात असताना त्यांनी वत्सलाबाई यांना शिवीगाळ केली.

त्यावेळी आरोपी सुरेश रंगनाथ शिंदे हा हातात कुऱ्हाड घेवून व आरोपी सविता शिंदे हि हातात काठी घेवून बाहेर आले आणि वत्सलाबाईला म्हणाले तुझी नात व सून यांना समजावून सांग असे म्हणून शिवीगाळ केली. आणि सुरेश शिंदे याने वत्सलाबाई हिचे डोक्यात कुऱ्हाड मारली. तर सविता हिने काठीने मारले. त्यावेळी वत्सलाबाई हिने आरडाओरडा केला असता तिचे पती दिनकर व मुलगा शिवाजी हे पळत घटनास्थळी आले. 

त्यावेळी सुरेश शिंदे याने दिनकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा जबरदस्त ठोका मारला. त्यामुळे ते खाली पडले. शिवाजी हे मध्ये पडले असता त्यालाही कुऱ्हाडीने डोक्यात मारले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी जखमी दिनकर यांना जिपमधून सुपा येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये आणले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जखमीला नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी दिनकर यांना मृत घोषित केले तर जखमी वत्सलाबाई व शिवाजी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत शिवाजी दिनकर शिंदे यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पो.नि. व्ही.टी. वाखारे यांनी तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांचे समोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार पो.नि. व्ही.टी. वाखारे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

सरकारपत्राचा पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी सुरेश शिंदे व सविता शिंदे यांना दोषी धरुन भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रु. दंड, भादवि कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, भादवि क. ५०४ अन्वये १ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपींनी एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकार पक्षातर्फे ॲड. घोडके यांना सहाय्यक फौजदार भांबळ यांनी सहाय्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.