श्रीगोंद्यात दुचाकीचोरांची टोळी पकडली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात दिवसेंदिवस विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या बाजीराव पोवार यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तीन दुचाकी चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध कंपनीच्या तब्बल आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा शहर व परिसरातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिस निरीक्षक पोवार यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीसह दिवसा देखील गुन्हे प्रतिबंधक पोलिसांचे गस्ती पथक नेमले आहे. शहरातून काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जात असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या.

त्यामुळे शहरातील काहीजनांवर पोलिसांचा संशय होता. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा गुन्हे प्रतिबंधक पथकातील पो उपनिरीक्षक महावीर जाधव,पो कॉ अमोल आजबे, राऊत, टाके, किरण बोराडे, देवकाते यांचे पथक गस्त घालत असताना, शहरातील सिद्धार्थनगर चौकातून तीन इसम दुचाकीवरून वेगाने बसस्थानकाच्या दिशेने गेले. सदर पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना बसस्थानकासमोरील रस्त्यावर थांबवले. 

त्यांच्याकडे विचारपूस केली, त्यावर त्यांनी १)श्रीकांत पंडित घोडके (वय २३,रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा) २) राजेश हरिभाऊ वटकर (वय २०,रा.ढोरगल्ली, श्रीगोंदा) ३) अविनाश आकाश घोडके(२७, रा. इंदिरानगर, श्रीगोंदा) असे नावे सांगितली. त्यावर पोलिसांनी सदर बिगर क्रमांकाच्या दुचाकीबाबत विचारणा केली असता. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. 

तसेच या त्यांच्याकडे दुचाकीची कोणतीही कागदपत्रे नव्हत. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. सदर तरुणांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी अशाच बिगर कागदपत्रांच्या जवळपास वेगवेगळ्या कंपनीच्या आठ दुचाकी शहरातील विविध ठिकाणाहून काढून दिल्या. 

यामध्ये १ लाल रंगाची कावासाकी, हिरोहोंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या ५ स्प्लेंडर प्लस, काळ्य रंगाची रॉईल्ड इन्फिल्ड कंपनीची १बुलेट, १ काळ्या रंगाची २२०सीसी पल्सर या दुचाकीचा समावेश आहे. या आठही दुचाकीच्या मालकीहक्काबाबत त्यांच्याकडे कोणताही पुरावा किंवा कागदपत्रे नव्हती. त्यामुळे सदर दुचाकी या तिघांनी कुठून तरी चोरून आणल्या असाव्यात, असा पोलिसांचा संशय बळावला. 

त्यामुळे चौकशीकामी पोलिसांनी या तिघा आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना अटक केली आहे. सदर दुचाकी चोरांकडे पोलिस कसून चौकशी करीत असून, यातून दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.