पोलिसानेच केला आपल्या मावसभावाचा खून, सोशल मिडीयामुळे झाला गुन्हा उघड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात टाकळी येथे सापडलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या हत्येमागे एका पोलीस कर्मचार्याचा हात असल्याचे तपासात उघड झाले असून आरोपी मयताचा मावसभाऊ असून अनैतिक संबधाच्या संशयातून हि हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी बाभूळगाव या रस्त्याचे कडेला दि ६ जुलै १७ रोजी सकाळी एक अनोळखी मृतदेह सापडला होता. याबाबतच्या बातम्या सोशल मिडीयावर फोटोसह प्रसारित झाल्यानंतर मयत नितीन अर्जुन यादव वय 33 हा वायफळ ता. जत जी. सांगली येथील असल्याचे ओळख पटली होती. मयत हा २ जुलै रोजी गावावरून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे दिंडीमध्ये गेलेला होता.

त्याचे जवळ मोबाईल होता त्यात दोन सीम कार्ड होते याशिवाय कपड्याच्या पिशवीत दोन मोबाईल चार्जिंगच्या पावर बँक, कपडे होते एकादशी झाल्यानंतर तो घरी जाण्यासाठी ५ जुलै रोजी पंढरपूर वरून निघून घीरडी ता. सांगोला जी. सोलापूर येथे आला असताना तेथूनच तो बेपत्ता झाला होता त्याबाबत सांगोला पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग दाखल करण्यात आली होती.

मयताच्या मोबाईल नंबरचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता त्याचा नंबर दि ५ जुलै रोजी दुपारी १५-१० वाजता बंद झाला होता. त्यामुळे तपासाला अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान मयताचा भाऊ प्रदीप यादव यांनी आपल्या भावाला whats app वरून दि ७ जुलै रोजी हाय हा मेसेज टाकला होता. सदरचा मोबाईल बंद असल्याने तो मेसेज डीलीव्हर झाला नव्हता.

अचानक एके दिवशी आपण पाठवलेला हा मेसेज डिलिव्हर झाल्याचे प्रदीप याचे लक्षात आले. त्यांनी हा मेसेज किती तारखेला डिलिव्हर झाला हे पाहिले असता मयताचा मोबाईल दि २६ जुलै रोजी आला होता हे त्याचे लक्षात आले त्याने लगेच या सर्वाचे स्क्रीन शॉट काढून ते कर्जत पोलिसांना पाठवले या माहितीच्या आधारे कर्जत पोलिसाच्या तपासाला गती मिळाली व त्यांनी सर्व माहिती सायबर सेलला पाठवली.

तेथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना त्याचे लोकेशन मंगळवेढा येथे असल्याचे कळवले यावरून दि १३ ऑगष्ट रोजी कर्जत पोलिसांनी मंगळवेढा येथे जाऊन तपास केला व अगोदर पासून संशयाच्या भोवर्यात असलेल्या दत्तात्रय गोरख भोसले याच्या घरा ची झडती घेतली असता मयत नितीन यादव याचा गोल्ड रंगाचा मोबाईल घरात सापडला.

यावरून आरोपी दतात्रय भोसले यास रात्री अटक करण्यात आली. आरोपी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक म्हणून काम करत असून त्यांने आपले पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच गुन्हा कबूल केला. याबाबत अधिक माहिती सांगताना पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी सांगितले कि मयत नितीन याचा आरोपी दत्ता हा मावस भाऊ असून अनैतिक संबधातून त्याचा खून झाला असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पुढील तपास करत आहोत.

सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अती. पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत भोये, सायबर सेलचे सुनील पवार, याचे सह पो. कर्मचारी दादासाहेब भापकर, भाऊसाहेब कुरुंद, दत्तात्रय कासार, ह्दय घोडके यांनी तपासासाठी विशेष परिश्रम घेतले.

मयताचा मोबाईल आरोपीने आपल्या घरी बंद करून ठेवला होता दि २६ जुलै रोजी आरोपीच्या पत्नीने चुकून हा मोबाईल सुरु केला व त्याच वेळी प्रदीप याचा मेसेज डिलिव्हर झाला व यातूनच हा गुन्हा उघडकीस येण्याचा मार्ग मोकळा झाला या प्रकरणात सोशल मिडीयाचा अत्यंत सकारात्मक उपयोग पुढे आला असून कर्जत पोलिसांनी तत्परतेने तपास केल्याचे प्रतिक्रिया मयताचा भाऊ प्रदीप यादव यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.