काही महिन्यांपुर्वी झालेला रस्ता पावसाने गेला वाहून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रभाग क्र.18 मधील मंगलगेट, कोंड्यामामा चौक येथे काही महिन्यांपुर्वी डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता रविवारी झालेल्या पावसाने वाहून गेल्याने झालेल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष पै.पवन भिंगारे यांनी केली आहे.

अनेक दिवसा पासून मंगलगेट, कोंड्यामामा चौक येथे रस्त्याचे काम प्रलंबीत होते. नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन या रस्त्याचे काम मार्गी लावले. मात्र नुकतेच झालेल्या पावसाने सदर रस्ता पुर्णत: उखडून खडी वर आली आहे. तर अनेक ठिकाणी खड्डे पडून पाणी साचले आहे. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम नागरिकांच्या माथी मारल्याने स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

टक्केवारीच्या राजकारणात नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात आहे. अशा कामांद्वारे सामान्य नागरिकांच्या पैश्याची उधळपट्टी महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे. काजूच्या भावात नागरिकांना शेंगादाणे देण्याचा प्रकार चालू आहे. काही महिन्यातच पावसाने रस्ता वाहून जात असल्याने, सदर रस्त्याच्या कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पै.भिंगारे यांनी केला. 

तसेच या रस्त्याच्या कामाची चौकशी होण्यासाठी स्थानिक नागरिकांसह मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असून, सदर कामाची चौकशी न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.