मनाला स्वत:चा मित्र बनवून भक्तीमार्गाकडे वळा : हेमलताजी शास्त्री.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मनावर नियंत्रण नसल्याने मनुष्य वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. कालांतराने हे आकर्षण व्यसनात परिवर्तित हेाते. अशा वाईट सवयी सोडून भक्तीमार्गाला लागणे अतिशय कठिण असते. यासाठी स्वत:च्या मनाला मित्र बनवून त्याला साधना मार्गाकडे वळवावे. प्रयत्नांमध्ये सातत्य व सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास भक्तीचा आनंद मिळून परमात्म्याचरणी लीन होता येते. यासाठी एखाद्या रोपट्याप्रमाणे मनाची मशागत करावी, कालांतराने फळ निश्‍चित मिळेल, असा संदेश राष्ट्रीय संत हेमलताजी शास्त्री यांनी दिला. 


नंदनवन लॉन्स येथे जाधव परिवार व नंदनवन उद्योग समूह आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयात मंगळवारी तिसर्‍या दिवशी हेमलताजी यांनी भागवत कथेतील परिक्षित राजा व शुकदेव यांची कथा सादर करताना विविध दाखले देत प्रबोधन केले. हेमलताजी शास्त्री म्हणाल्या की, प्रत्येकाला ध्यानधारणा करून भगवंताशी एकरुप होण्याची इच्छा असते. मात्र ध्यान करण्यास बसल्यावर एकाग्रता होत नाही. 

मन इतरत्र भटकते. सर्वत्र भ्रमण करणार्‍या मनाला एका ठिकाणी बांधून ठेवणे शक्य नसते. त्यासाठी एखाद्या मुंगीप्रमाणे सातत्य व चिकाटीची गरज असते. मुंगीला गुरू मानून तिच्याकडून चिकाटीची शिकवण घेतली पाहिजे. निसर्ग हा मनुष्याचा सर्वात मोठा गुरू आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट मनुष्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता काही ना काही देत असते. निसर्गाची ही परापेकारी वृत्ती आपणही अंगिकारली पाहिजे. 

जेव्हा मन स्थिर असते तेव्हाच ही वृत्ती तयार होते. यासाठी मनाला शत्रू न मानता आपला मित्र बनवावे. श्रीकृष्ण नामघोषावर पूर्ण विश्‍वास ठेवून भक्ती केली पाहिजे. यातून मिळणारा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असेल. महाभारतावेळी भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधन व अर्जुनाला ज्ञान दिले. मात्र दुर्योधनाची श्रध्दा नसल्याने त्याला श्रीकृष्ण वचनांचा अर्थ कळला नाही. अर्जुनाची मात्र श्रीकृष्णांवर पूर्ण श्रध्दा होती. यातूनच कुरूक्षेत्रावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशातून जगाला ज्ञान देणारी भगवत गीता निर्माण झाली. 

यावेळी बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव, संजय जाधव, दत्ता जाधव, नंदलाल मणियार, मगनशेठ पटेल, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, पंडित विजयशंकर मिश्रा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.