ब्लॉग - टॉयलेट एक प्रेम कथा ''ये सौच की नही सोच की बात हैं...!'


माझ्या जीवनातला सर्वात उत्कृष्ट चित्रपट ज्याने मला माझा गत 12 वर्षाचा प्रवास आठवला. गेली कित्येक वर्ष आम्ही स्वच्छतेचा विषय हाताळत आहोत. त्याला आता हळूहळू यश मिळत आहे...एक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी आम्ही तब्बल 42 दिवस लोकांची घाण उचलत होतो, एवढ्या साऱ्या खटाटोपानंतर लोकांच्या विचारांमध्ये फरक पडला आणि माझ्या आयुष्यातलं पाहिलं हागणदारी मुक्त ग्राम घडलं ...'ब्राम्ही' नावाचं गाव ...!  तसेच नगर जिल्ह्यातील लोहगाव गावाला संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळवून दिला याच आज मनाला खूप बरं वाटलं.

त्या दिवासापासून आजतागायत स्वच्छतेचा अजेंडा घेऊन आर्ट ऑफ लिविंग आणि युवाचेतना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत .यामध्ये दर वर्षी 31 डिसेंम्बर ला शेकडो युवकांसोबत अहमदनगर शहरातील 450 हुन अधिक सार्वजनिक शौचालय स्वच्छता अभियान, आषाढी निम्मित पंढरपूर स्वछता अभियान,विविध यात्रा स्थळ स्वछता अभियान ,तालुका बसस्थानक स्वच्छता अभियान , तसेच गावोगावी नियोजित स्वच्छता अभियान यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. 

पंतप्रधानाच्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी हजारो युवक रस्त्यावर उतरले आणि हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. स्वच्छतेचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरला आजचा चित्रपट ''टॉयलेट एक प्रेम कथा'' त्यामुळे मनात असलेल्या कित्येक विषयांना तोंड फुटणार हे नक्की. समाज आजही संस्कृतीच्या नावाखाली केवळ खुळचट प्रथांना चिकटून बसलेला दिसतो . नको असलेल्या आणि माहित नसलेल्या खुळ्या समजुतींना अवास्तव महत्व दिल्याने आजही महिला सुरक्षित नाही, तिची अब्रू आजही रस्त्यावरच आहे कारण त्याला फक्त घरात सौचालय नसणं हेच आहे.

आज सार्वजनिक ठिकाणी बसस्टँड , रेलवस्थानक ,सरकारी दवाखाने याठिकाणची टॉयलेट अक्षरश: घाणीने भरलेली आहेत तिथे जाणं म्हणजे आजाराला खुले निमंत्रणच आहे . रेल्वे मध्ये आजही स्त्रीयांसाठी स्वतंत्र टॉयलेट पाहावयास मिळत नाहीत . नगर शहारातील कित्येक ठिकाणी महिलांची स्वच्छतागृहे नसल्यामुळे अवहेलना होते हि स्थिती अनेक छोट्यामोठ्या शहरांची आहे. 

महिलांना कित्येक लहान-मोठे आजार केवळ या कारणांमुळे होतात . जर आपल्याला वाटत असेल की आपली अब्रू रस्त्यावर येऊ नये तर आपण आपल्या घरात टॉयलेट बांधलेच पाहिजे आणि सार्वजनिक टॉयलेट ची स्वच्छता ठेवली पाहिजे हेच आजच्या घडीला आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मला वाटतं. अक्षय कुमारजींच्या चित्रपटामुळे आजच्या समाजावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल याची आशा वाटते. आज खरंच माझा भारत देश बदलतोय मात्र यात आपलं सर्वांचं योगदान हवं आहे, त्याची सुरुवात स्वछतेेपासून व्हावी आणि निम्मित टॉयलेट असावं असं मला वाटत तुम्हाला काय वाटतं...??

- अमर कळमकर
Powered by Blogger.