आधार नोंदणीसाठी सेतु संचालकांकडून जनतेची आर्थिक लूट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आधार नोंदणी बाबत अकोले तालुक्यातील नागरीक समाधानी नक्कीच नाहीत. कारण अनेक नागरीकांना आधार नोंदणीसाठी वारंवार केंद्रावर जावे लागते. एकदा नोंदविलेले आधार कार्ड अपडेट होईलच याची खात्री नाही. त्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.


ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी सांगितले की याबाबत आमचेकडे नागरीकांच्या विविध तक्रारी आल्या. म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी शासनाला यासंबंधी निवेदन देखील दिले आहे. सेतु चालकांकडून सरासरी 100 रूपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याने जनतेची मोठी लुट होत आहे.

शिवाय मान्यता घेतलेले अनेक आधार नोंदणी केंद्र बंद झाल्यामुळे सुरू असलेल्या केंद्रावर तोबा गर्दी होत आहे. दिवसभर लांबलचक रांगेत नागरीकांना उभे रहावे लागते. त्यात लाईट, कनेक्टिवीटी याची अडचण निर्माण झाल्यास पुन्हा चकरा मारण्याचे काम होते.
जिल्हातील कोपरगांव येथे पोस्टामध्ये आधार कार्ड दुरूस्ती सेंटर देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे येथील पोस्टात देखील आधार केंद्र सुरू व्हावे अशी मागणीही मंडलिक यांनी केली आहे. पोस्टामध्ये दिल्या जाणार्‍या सुविधेमध्ये डेमोग्राफिक अपडेट रू. 25/-, बायोमॅट्रीक अपडेट रू. 25/-, आधार सर्च व रंगीत प्रिंट रू. 20/- तर कृष्णधवल प्रिंटचे फक्त रू. 10/- घेतले जातात. 

याशिवाय बीएफडी स्टेटस सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशीच मागणी आदिवासी व डोंगराळ अकोले तालुक्यातील जनतेसाठी देखील उपलब्ध करून द्यावी.
निवेदनावर ग्राहक पंचायतचे सचिव दत्ता शेणकर, रमेश राक्षे, नरेंद्र देशमुख, राम रूद्रे आदींच्या सह्या आहेत. तर अ‍ॅड.भाऊसाहेब वाळुंज, शुभम खर्डे, दत्ता रत्नपारखी, भाऊसाहेब वाकचौरे, रामहरी बोडके, सकाहरी पांडे, प्रमोद मंडलिक, सुदाम मंडलिक, रामदास पांडे आदी कार्यकर्त्यांनी यास समर्थन दिले आहे.

तहसिल कार्यालयावजळच होणारा हा प्रकार ग्राहकांच्या रांगा आणि होणारी पैशांची लुट हे सर्व जाणारे येणारे तहसिलचे अधिकारी व कर्मचारी दररोजच पाहतात. तरी या गोष्टीकडे न पाहिल्यासारखे करतात याचे फार वाईट वाटत असल्याचेही मंडलीक म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.