श्रीगोंदा पालिकेसमोर कचरा टाकून पेटवला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगान परिसरात कचरा टाकून पेटवून दिला जातो. यामुळे धूर, दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्याचा संताप व्यक्‍त करत नागरिकांनी कचऱ्याचा ट्रॅक्‍टर श्रीगोंदा पालिकेसमोर खाली केला. हा कचरा पेटवून देत महिलांनी पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.
शहरात वेळेवर साफसफाई होत नाही. डास निर्मूलनासाठी उपाययोजना होत नाही. डासप्रतिबंधक धूर फवारणी होत नाही. यामुळे शहरातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. लाखो रुपये ठेकेदारांच्या घशात जाऊनही शहरातला फक्‍त कचरा गोळा करून डंपिंग ग्राउंडवर टाकण्याचे कामही त्यांच्याकडून होत नाही. 

गोळा केलेल्या कचऱ्यामुळे रायकर वस्ती, वडवकर वस्ती, शिंदे वस्ती, साळवणदेवी रस्ता, भिंगान रस्ता परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. डंपिंग ग्राउंडवर टाकलेली मृत जनावरे, ओला कचरा, मैला, कागद, प्लॅस्टिक यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात दुर्गंधी सुटली आहे. हा कचरा पेटवून दिल्याने त्रासात आणखीच भर पडली आहे. मृत जनावरे उघड्यावर टाकल्याने परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांना परिसरातून चालणेही मुश्‍किल झाले आहे, याकडे महिलांनी लक्ष वेधले.

मागील तीन वर्षांपासून नागरिक वारंवार आंदोलने करत होते. परंतु, ठोस निर्णय होत नसल्याने या नागरिकांनी पालिकेचा या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी गेलेला ट्रॅक्‍टर पालिकेसमोर आणण्यास भाग पाडले. यावेळी काही पालिका कर्मचारी आणि नागरिक यांची शाब्दिक चकमक झाली. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी पेटलेला कचरा विझवण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पल्लवी रायकर, सोनाली रायकर, कल्पना रायकर, दादा काळे, नाना शिंदे, मंदा वडवकर, सुरेखा वडवकर, पुष्पा रडे, ज्योती शिंदे, सुरेश रायकर, नितीन रायकर, नवनाथ रायकर, मंदा शिंदे, बाबू बोडखे, डॉ. कोथिंबिरे यांनी पालिका कारभाराबाबत आक्रमक पवित्रा घेतला. बांधकाम सभापती अशोक खेंडके, नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे, अख्तर शेख, बापूराव गोरे, एम. डी. शिंदे यांच्यासमोर कचरा पेटवून देण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.