श्रीगोंद्यात माजीमंत्री,वकील आणि पोलिसांच्या घरी चोरीचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहरात रविवारी मध्यरात्री अनेक ठिकाणी चोरांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात कुठेही कोणताही ऐवज चोरीला गेला नाही. शहरातील माजी मंत्र्याच्या कार्यालयासह तहसीलदार, पोलीस, वकील यांच्यासह अनेकांच्या घरी रात्री घरफोडी करण्याचा प्रयत्न केल. मात्र यापैकी कोणत्याही ठिकाणी चोरांना चोरी करण्यात यश आले नाही. या प्रकाराने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


शहरातील खेतमाळीस मळ्यात ज्ञानेश्वर खेतमाळीस व त्यांचे वडील चंद्रकांत देवराम खेतमाळीस हे दोघे चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत किरकोळ जखमी झाले आहेत. खेतमाळीस हे रात्री झोपले असता, पहाटे ३ वाजेच्या सुमारास कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने ते जागे झाले. कुत्रे का भुंकते हे पाहण्यासाठी ते बाहेर आले असता बाहेर उभ्या असलेल्या चोरांनी या पिता पुत्रास दगड, काठीने मारहाण केली.

मध्यरात्रीच्या सुमारास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या शहरातील पंतनगर परिसरातील माऊली निवास या कार्यालयातील दरवाजाचे कुलूप तोडून आता शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर विधीज्ञ जे.डी.अनभुले यांच्या आईची देवाज्ञा झाल्याने घरातील सर्व मंडळी अंत्यविधीसाठी चोराचीवाडी या ठिकाणी गेले होते.

घरी कोणी नसल्याचा फायदा उठवत, चोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्याही घराचा दरवाजा तोडून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. शिक्षक कॉलनीकडे या चोरांनी आपला मार्चा वळविला त्या परिसरात राहणाऱ्या आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनील निकम, दादा टाके व कऱ्हाळे या पोलिसांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सर्वत्र उचकापाचक केल्याचे चित्र दिसत होते. मात्र आपली कोणतीही वस्तू अथवा पैसे चोरीला गेले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस तोरडमल यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या सर्व चोऱ्यांच्या घटनांमधून कोणताच मुद्देमाल चोरीला गेलेला नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार नेमका कशासाठी व कोणी केला हे शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र पोलिसांच्याच घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पोलिसांपुढे आता तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. 

या प्रकरणी ज्ञानेशवर चंद्रकांत खेतमाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ५ ते ६ चोरांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चोरी करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि सिध हे करीत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.