कर्जत पंचायत समितीची ना. शिंदे यानी घेतली झाडाझडती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कर्जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी पंचायत समितीची उलटतपासणी करत अधिकार्याना चांगलेच फैलावर घेतले. आढावा फक्त आकडेवारी ऐकण्यासाठी घेत नसून त्याचा थेट परिणाम दिसला पाहिजे कोणतीही तयारी केली नसल्याने पुन्हा बैठक घेऊ त्यावेळी काम दिसले पाहिजे असा सज्जड दम देत ना. शिंदे यांनी अधिकार्यांना घाम फोडला.


यावेळी पदाधिकार्यांनी केलेल्या तक्रारी गांभीर्याने घेण्यात आल्या. कर्जत येथे आज जलसंधारण मंत्री व पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी फक्त पंचायत समितीच्या कामकाजाचे अवलोकन करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात अधिकार्याची आढावा बैठक घेतली. यावेळी घेताना विविध विषयावर ना. राम शिंदे यांनी गटविकास अधिकारी दराडे याना निरुत्तर केले. 

तालुक्यातील २००६ पासून काही घरकुले अपूर्ण असल्याच्या विषयावर ना. शिंदे यांनी याची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा, हि कामे पूर्ण कशी होतील यासाठी मार्गदर्शन मागवा अशा सूचना देताना दराडे यांना या प्रश्नावर ना. शिंदेचे समाधान करता आले नाही. स्वच्छता कक्षाचा आढावा घेताना नामदारानी तालुक्यातील सर्वात कमी काम असलेल्या पाच गावाची नावे विचारली त्यास ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सुद्रिक यांनी आंबीजळगाव सांगितले यावर हि सुद्रिक यांना आपण काय प्रयत्न केले याचे उत्तर तर देता आले नाही मात्र जस जसे अधिक प्रश्न विचारले गेले तसे अधिकारी अडचणीत येत होते. 

१५ ऑगष्ट पर्यत काम पूर्ण करू असे उत्तर दिल्यानंतर ३५ दिवसात २८७ घराचे संडास पूर्ण कसे करणार यासाठी कोणते नियोजन केले आहे याची उत्तरे देता आली नाही यावेळी सर्वात कमी काम असलेले गाव हे नवसरवाडी हे असून तेथे फक्त १५ टक्केच काम झाले आहे याशिवाय नांदगाव १७ टक्के तरडगाव २० टक्के अशी खरी माहिती दिल्यानंतर ना. शिंदे याचा पारा चढला व आपण अगोदर आंबीजळगाव असे चुकीचे उत्तर का दिले असे विचारत आपल्या दोघाच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे का या प्रश्नाने अधिकारी जास्तच अडचणीत येत होते. 

स्वच्छता कामात किती ग्रामसेवकांना नोटीसा काढल्या यावर कालच ४४ लोकांना नोटीसा काढल्याचे उत्तरावर हि मंत्रीमहोदयानी बिडीओ प्रश्नाचा भडीमार केला. रोजगार हमीच्या कामाचा आढावा घेतांनाहि तिखी येथे सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामाबाबत हे काम जलयुक्त मध्ये का घेतले नाही याचे समर्पक उत्तर अधिकार्याना देता आले नाही. 

विस्तार अधिकारी भोंग यांनी अगोदरच कामे मंजूर असल्यामुळे ते काम जलयुक्त मध्ये घेतले नाही असे उत्तरावर जलयुक्तच्या समितीचे अध्यक्ष तहसीलदार किरण सावंत हे असून त्यांनी बैठक घेऊन आपल्याला कामे विचारली नाहीत का आपण त्या समितीत सदस्य नाहीत का मग हे काम जलयुक्त मध्ये का घेतले नाही यावर शासन निर्णय आपण वाचला नाही का? असे म्हणत भोंग यांना निरुत्तर केले. 

या झाडाझडती दरम्यान गटविकास अधिकारी दराडे यांनी आपल्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही मला आपल्या अडचणी अगोदर का सांगितल्या नाहीत आता आढावा घेतोय म्हणून तुम्ही कारणे शोधताय काय असे म्हणत पुन्हा निरुत्तर केले. यानंतर बांधकाम विभागाच्या आढाव्याचे वेळी तर कळसच झाला पदाधिकार्यांनी थेट अधिकार्यावर विश्वासात घेत नाहीत कुठलीही माहिती देत नाहीत असे म्हणत सभापती पुष्पा शेळके व उपसभापती प्रशांत बुद्धीवंत यांनी थेरवडी येथील बंधार्याची तक्रार केली बारडगाव येथील तक्रार केली 

पण हे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे गंभीर आरोप केले. यावेळी बांधकाम विभागाने आपल्या कामाची टिपणी हि ठेवलेली नव्हती या सर्वच प्रकाराने शेवटी ना. शिंदे यांनी सर्व अधिकार्यांना सज्जड इशारा देत आज पंचायत समितीच्या अधिकार्यानी कोणतीही व्यवस्थित तयारी न केल्याने लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊ त्यावेळी सर्वांनी आपल्या कडे असलेल्या कामाची संपूर्ण माहिती ठेवली पाहिजे हि कामे किती कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजेत, वेळेत पूर्ण झाली नसतील तर का? त्यात अडचणी कोणत्या याची स्वतंत्र माहिती असली पाहिजे आढावा देताना मोजक्या शब्दात मोजके बोलून उत्तरे दिली पाहिजेत, आढावा म्हणजे नुसती आकडेवारी बघायला आपण आलो नाहीत त्यातून समाधानकारक काम झाले पाहिजे, या सर्वाचा एकत्रित परिणाम तालुक्याच्या विकासावर होतो म्हणून याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, यावेळी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांनी गट विकास अधिकारी व बांधकामचे अधिकारी कोणतीच माहिती देत नाहीत समन्वय ठेवत नाहीत, शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती देत नाहीत, अशा तक्रारी केल्यानंतर ना. शिंदे यांनी सर्व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतलेच पाहिजे आम्ही याना विचारून कामे करा यांना विश्वासात घेऊ नका असे काही कोणी सांगितले आहे का ? त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधीना माहिती हि दिलीच पाहिजे असे खडसावून सांगितले.

 यावेळी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांनी तालुक्यात पशुसंवर्धन विभाग लसीकरणच करत नसल्याचा थेट आरोप केल्या नंतर यावर हि बरीच चर्चा झाली. पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांनी हि विविध विषयातील चर्चेत भाग घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. 

यावेळी नगराध्यक्ष नामदेवराव राउत, तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, अल्लाउद्दीन काझी, राजेंद्र देशमुख, बापूसाहेब शेळके, प्रकाश शिंदे आदी मोजकेच नेते उपस्थित होते, बैठकीस प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर याचे सह पंचायत समितीच्या सर्वच विभागाचे प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. 

ना. शिंदे यांनी अत्यंत शांतपणे बैठकीत प्रश्नाची सरबती करून अधिकार्यांना निरुत्तर केल्याने नक्कीच उपस्थित अधिकार्याच्या डोक्याला मुंग्या आल्या असतील लवकरच आपण पुन्हा आढावा घेऊ त्यावेळी सर्वांनी आपले कामे पूर्ण करून त्याचा अहवाल द्यायचा आहे असे सांगून पंचायत समितीमधील विविध अडचणीबाबतची स्वतंत्र माहिती त्वरित आपल्याला द्यावी असे आदेशहि यावेळी देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.