रोटरीने समाजकार्याची चळवळ व संस्कृती जोपासली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव येथील रोटरी क्लबने वर्षभरात सुमारे 85 तर इनरव्हील क्लबने 51 सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी खूप मोठे काम केले आहे. दुस-यांसाठी काहीतरी करावं, ही शिकवण समाजाला लागावी यासाठी रोटरीने नेहमीच पुढाकार घेतला. रोटरी व इनरव्हील या संघटनांनी जागतिक पातळीवर ख-या अर्थाने समाजकार्याची चळवळ व संस्कृती जोपासली आहे, असे प्रतिपादन ऊसतोड व आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आर्वी ( जि. बीड ) येथे शाळा चालविणारे शांतीवन प्रकल्पाचे समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी केले. शेवगाव येथील शुभम मंगल कार्यालयात शनिवारी ( दि. 15 ) सायंकाळी आयोजित रोटरी व इनरव्हीलच्या पदाधिका-यांच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी शेवगाव रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ. गणेश चेके यांनी नूतन अध्यक्ष भागनाथ काटे यांच्याकडे , सचिव डॉ. आशिष लाहोटी यांनी नूतन सचिव डॉ. दिनेश राठी यांच्याकडे तर शेवगाव इनरव्हीलच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. मनिषा लड्डा यांनी नूतन अध्यक्षा डॉ. प्रिती राठी यांच्याकडे तसेच मावळत्या सचिव रूपाली तडवळकर यांनी नूतन सचिव वसुधा सावरकर यांच्याकडे आपल्या पदाची सूत्रे बहाल केली. दै.सकाळचे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे सहप्रांतपाल डॅनिअल इंगळे, प्रांताधिकारी डॉ. विक्रांत बांदल उपस्थित होते.

नागरगोजे म्हणाले, दिवंगत समाजसेवक डॉ. बाबा आमटे, डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांच्या समाजकार्यापासून मला प्रेरणा मिळाली. सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवास हा प्रकाशाकडून अंधाराकडे असतो. अंधार जेथे असेल तेथे उजेड निर्माण करायचा. पुन्हा अंधार शोधायचा.. अन् तेथे उजेड व आनंदाची बेटं तयार करायची, असा हा प्रवास अव्याहतपणे सुरू ठेवावा लागतो.

शासनाचे कोणतेही अनुदान नसतानाही ऊस तोड कामगारांची 21 मुले व अनाथ 19 मुले अशा 50 मुलांची शाळा सन 2001 मध्ये आर्वी ( जि. बीड ) येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करून शांतीवन प्रकल्पाची उभारणी केली. पहिल्यांदा विरोध झाला, नंतर हे काम चांगले असल्याचे लक्षात आल्यावर मदतीचे हात पुढे आले. आत्महत्या ग्रस्त शेतक-यांची मुले , देवदासीं व कुंटणखान्यातील मुलेही या शाळेत शिकत असून सध्या 782 मुले शिक्षण घेत आहेत. भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी या प्रकल्पाला सुमारे 40 लाखांची मदत केली आहे. या प्रकल्पातून अनेक मुलां मुलींच्या यशोगाथा तयार झाल्याचा आनंद माझ्या जीवनात उर्जा देत आहे.

डॉ. बोठे पाटील म्हणाले, कोणाकडे वर्गणीसाठी हात पुढे न करता रोटरी या संस्थेने उपेक्षित, शोषित घटकांसाठी चांगले कार्य केले आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना रोटरीने केलेले समाजकार्य आदर्शवत ठरले आहे.

रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ. चेके व इनरव्हीलच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. लड्डा यांनी आपल्या कामाचा आढावा घेत नूतन पदाधिका-यांनी शुभेच्छा दिल्या.रोटरीचे नूतन अध्यक्ष काटे व इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. प्रिती ऱाठी यांनी समाजकार्याचा वसा वृद्धींगत करण्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगीतले.

जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, डॉ. संजय लड्डा, अमरापूरचे सरपंच विजय पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, पुरूषोत्तम बिहाणी , प्रा. किसन माने आदी उपस्थित होते.
या वेळी रोटरी व इनरव्हीलच्या नूतन सदस्यांना पाहुण्यांच्या हस्ते संस्थेची पिन प्रदान करण्यात आली. प्रा. दिलीप फलके व राजश्री रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. दिनेश राठी यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.