लव्हाट यांचे वृक्षप्रेम प्रेरणादायीः पालकमंत्री शिंदे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव शहराजवळील माळरानावरील स्वतःच्या शेतात उद्योजक तथा भाजपचे नेते दिनेश लव्हाट यांनी सुमारे तीन हजार विविध वृक्षांची लागवड व संवर्धन केले आहे. दुष्काळात टॅंकरने पाणी देऊन जगवलेल्या झाडांची चांगली वाढ झाली असून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी शेवगावच्या दौ-यात लव्हाट यांच्या वृक्षप्रेमांचे कौतूक केले. उद्योजक लव्हाट यांचे वृक्षलागवडीचे कार्य प्रेरक असल्याचे गौरवोद्वार शिंदे यांनी काढले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शेवगाव - गेवराई रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यानंतर, शेवगाव जवळील लव्हाट यांच्या शेतात जाऊन तेथील झाडांची त्यांनी पाहणी केली. उद्योजक दिनेश लव्हाट हे शेतकरी कुटूंबातील असल्याने त्यांना वृक्षलागवडीची लहानपणापासून आवड आहे. शेवगाव शहरात ट्रॅक्टर व्यवसाय व अजिंक्य लॉन्सची अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळणारे लव्हाट यांनी व्यस्त व्यवसायातून वेळ काढत तीन वर्षांपुर्वी शेवगाव जवळील माळरानावरील त्यांच्या शेतात वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी विविध रोपवाटिकेतून त्यांनी वृक्षांची रोपे खरेदी केली. वृक्षांच्या संरक्षणासाठी शेताभोवती कुंपन घातले. काशिद, गुलमोहर, हायकस, लिंब, चिंच, बोगनवेल, बांबू, करंज, निलमोहर, कन्हेरी अशा विविध वृक्षांची लागवड त्यांनी केली. झाडांना पाणी देण्यासाठी तब्बल सात कुपनलिका घेतल्या आहेत. पहिल्या चार कोरड्या गेल्यानंतर पाचव्या कुपनिलेकाला पाणी लागले. दुष्काळ व उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात कुपनलिकेला पाणी कमी पडल्यावर त्यांनी विकतचे पाण्याचे टॅंकर घेऊन वृक्षांची जपवणूक केली आहे. खते, औषधांची फवारणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिल्याने वृक्ष बहरले आहेत.

या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सरचिटणीस भीमराज सागडे, नगरसेवक अशोक आहुजा, अरूण मुंडे, महेश फलके, नितीन दहिवाळकर, भाजप शहराध्यक्ष रवी सुरवसे, गंगा खेडकर, उदय शिंदे, सचिन कुसळकर, गणेश कराड, वाय. डी. कोल्हे, नितीन फुंदे, मच्छिंद्र कर्डिले, अमोल घोलप आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.