बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विधानसभेत आवाज उठविणार - आ.जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातला पहिला नगर जिल्हा असा आहे की, या जिल्ह्याने कामगार कल्याणाच्यादृष्टीने मोठा लढा उभारला होता. स्व.शंकरराव घुले यांनी माथाडी कायदा, 50 किलोचे पोते, असंघटीत कामगारांचे संघटन करुन निर्णायक व कायदेशीर मार्गाने लढा देऊन कामगारांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. इमारत बांधकामाच्या मजुरांसाठी शासनाकडे पैसे मोठ्या प्रमाणावर पडून आहेत, फक्त त्याचे योग्य प्रकारे नियोजन होणे गरजेचे आहे. आज अनेक कामगार अनेक योजनांपासून वंचित राहिले आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबत आपण प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. 


नगर जिल्हा व इमारत बांधकाम कामगार संघटेनेच्या वतीने कामगार मेळाव्या प्रसंगी कामगारांचे नोंदणी फॉर्म सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांच्याकडे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, सचिव नंदु डहाणे, राष्ट्रवादी शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, हमाल पंचायत उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकान, सागर गुंजाळ, अमोल गायकवाड, अजित साळवे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले, हमाल पंचायतच्या माध्यमातून अविनाश घुले सर्वांना बरेाबर घेऊन मोठ्या जोमाने ही चळवळ पुढे नेत आहेत. त्यांच्या या कार्यात आम्ही त्यांना सर्वोतोपरि मदत करु. कामगार कल्याणाच्या बाबतीत संघटन हे महत्वाचे आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात येते, ही एक चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. 

याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर म्हणाले, इमारत बांधकामाशी निगडीत सर्वांना सभासद होता येईल. त्याची कागदपत्राची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच योजनांचा लाभ मिळू शकेल, असे सांगून या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. 

याप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, जे असंघटित कामगार आहेत, त्यांना एकत्र करुन न्याय देण्याचा जो पुढाकार स्व.शंकरराव घुले यांनी घेतला होता. त्यांचा तोच वारसा आपण पुढे नेत आहोत. कामगारांचे एक स्वत:चे हक्काचे व्यासपीठ म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते. कामगारांच्या हिताच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेने केले आहे. त्यामुळेच बांधकाम कामगार यांच्या नावावर 5 हजार रुपये त्यांना साधन-सामुग्री घेण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगिलले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार अजित साळवे यांनी मानले. यावेळी बाबा अरगडे, गोविंद सांगळे, अभिजित खोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात संघटनेचे सचिव नंदू डहाणे संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील महिला व पुरुष कामगार उपस्थित होते. यावेळी अनेक कामगारांकडून अर्ज भरुन घेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. या उपक्रमांचे कामगारांनीही कौतुक केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.