इतक्या मोठ्या मतदारसंघात कोणाला कोठे वेळ देऊ ? - खा.सदाशिव लोखंडे.


दैनिक दिव्य मराठी :- शिर्डी मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ, सुमारे ९०० गावे येतात. प्रचंड लोकसंख्या आहे. शिवाय लोकसभेत वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मतदार संघात कसा राहणार? लोकांना खासदाराने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावावी, असे वाटत असते. मला हे शक्य होणार नाही, अशी मुक्ताफळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी उधळली.

लोखंडे निवडून आल्यानंतर तीन वर्षांत खूपच कमी वेळा मतदारसंघात आले आहेत. विरोधकांनी तर अनेकवेळा ‘खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर लोखंडे शहरात एका कार्यक्रमानिमित्त लोखंडे आले असता पत्रकारांनी त्यांना याविषयी छेडले असता त्यांनी वरील भाष्य केले.

निवडून दिल्यानंतर आपल्या मतदारसंघात राहून मतदारांच्या समस्या जाणून घेणे, त्यांची कामे करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. मात्र, खासदार लोखंडे यांचे घर मुंबईत आहे. लोकसभेत उपस्थितीसाठी ते अनेकवेळा दिल्लीत असतात. त्यामुळे मतदारसंघातील मतदारांना त्यांचे दर्शन दुर्मिळच असते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोखंडे हे ‘उपरे’ उमेदवार आहेत. लोकांना ते भेटणार नाहीत. कामा साठी मुंबई, दिल्लीला जावे लागेल, असा विरोधकांनी केलेला प्रचार लोखंडे यांनी खरा करून दाखवला. भेट तर दूरची गोष्ट आहे, अनेकवेळा लोकांनी कामासाठी फोन केला असता त्यास उत्तर देण्याचीही तसदी खासदार घेत नसल्याने अनेकांची नाराजी आहे. याचे कारण विचारले असता हसत हसत मिश्किलपणे खासदार लोखंडे म्हणाले, मी एकटा माणूस किती ठिकाणी उपस्थित राहू शकतो. मी दिल्लीत जरी राहत असलो तरी लोकांच्याच कामासाठी राहतो. लोकांना भेटत नसलो, तरी त्यांच्या कामासाठी कार्यरत असतो. मतदारसंघ मोठा आहे. मतदारसंख्या मोठी आहे. त्यामुळे कोठे कोठे वेळ देऊ, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सांसद ग्राम योजनेंतर्गत प्रत्येक खासदारास मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा होता. लोखंडे यांनी दोन वर्षांपूर्वी वाजत गाजत तालुक्यातील मालुंजे बुद्रूक गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. गावात जाऊन कार्यक्रम घेतला, फोटो काढले, बातम्या छापून आल्या. त्याची कात्रणे पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आली. नंतर मात्र मालुंजेकरांसाठी हे फक्त दिवास्वप्नच ठरले.

कार्यक्रमानंतर ना लोखंडे पुन्हा इकडे फिरकले ना त्यांनी दिलेल्या आश्वासनापैकी एक छदामही आतापर्यंत ग्रामपंचायतीस मिळालेला नाही. ग्रामस्थांनी लाेखंडेंना फोन केला, तरी उत्तर मिळत नाही. मालुंजे येथे राष्ट्रीय पेयजल योजना केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही योजना दुसऱ्या योजनेतून झाल्याचे सांगण्यात आले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. याबाबत छेडले असता लोखंडे म्हणाले, हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हावरे हे सर्वसाधारण गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा प्रश्नच येत नाही. मात्र, माझ्याऐवजी पक्षाला दुसरा उमेदवार द्यायचा असेल, तर आपली थांबायची तयारी आहे, असे लोखंडे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.