विकासाची गती कमी होऊ दिली जाणार नाही - पालकमंत्री प्रा. शिंदे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्री क्षेत्र थापलिंग मंदिर परिसर व विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, याठिकाणी होणारी विकासाची कामे ही दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देत कर्जत व जामखेड तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. विकासाची गती कमी होऊ दिली जाणार नाही, असा शब्द राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिला. 

टाकळी खंडेश्वरी (ता.कर्जत) येथील श्री थापलिंग मंदिर परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री प्रा. शिंदे आणि उपस्थितांच्या हस्ते यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्जत पंचायत समिती सभापती पुष्पा शेळके, नगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर, रामदास चौगुले, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, सामाजिक विभागाचे विभागीय वनाधिकारी श्री. भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सिंघल, सरपंच सुधीर फरताडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, माही जळगावचे सरपंच नानाभाऊ तोरडमल यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, टाकळी खंडेश्वरी येथील श्री थापलिंग देवस्थान हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच या भागाच्या विकासासाठी पर्यटन विकास निधीतून 1 कोटी 12 लाखाहून अधिक निधी देण्यात आला. या ठिकाणी मंदिर व परिसर विकासाची कामे हाती घेण्यात आली. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे, असे त्यांनी संबंधितांना सुनावले.

नैसर्गिक सौदर्याने नटलेला हा परिसर असून अधिकाधिक वृक्षलागवडीच्या माध्यमातून हा परिसर हिरवागार करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य शासन 4 कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी काम करीत आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग मोठा आहे. या परिसरातील नागरिकांनीही या वृक्षलागवड मोहिमेत योगदान देऊन त्यांचे संगोपन करुन समृद्ध पर्यावरणाचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. कर्जत आणि जामखेड विकासाच्या दृष्टीने अनेक कामे या दोन्ही तालुक्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले. टाकळी खंडेश्वरी बरोबरच पाटेगाव येथील मंदिराच्या सभामंडपालाही मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

सिद्धटेक येथे 400 के.व्ही.चे वीज उपकेंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची जागा महावितरणच्या ताब्यात आल्याचे ते म्हणाले. यामुळे आपण वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊच आणि अधिकची वीज शेजारच्या जिल्ह्यांना सुद्धा पुरवू, असे प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

तालुक्यातील विविध भागांतून रस्त्यांची मागणी होत असते. मात्र, लवकरच पक्के व चांगले रस्ते तयार कऱण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु असून राज्य स्तरावर यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करु, असे त्यांनी सांगितले. एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने टॅंकरची संख्या कमी झाली.

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून चांगले काम झाले. पावसाचे पाणी अडवल्याने सिंचन क्षमता वाढली. हेच काम मोठ्या जोमाने पुढे घेऊन जायचे आहे. ज्या गावांचा या अभियानात समावेश नाही, त्यांना जलसंधारण विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मात्र, या अभियानात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पाटेगाव (मासाळ) येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नाला बंधारा येथे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जलपूजन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.