शेतकरी, सभासद, कामगारांच्या नजरा डॉ. सुजय विखेंकडे.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्‍याची आर्थिक नाडी व शेतकरी, सभासद, कामगारां बरोबरच जनसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चाक चालू गळीत हंगामात फिरणार की परत रुतून बसणार, याबाबत तालुका वासीय साशंक आहेत. एकीकडे जिल्हा सहकारी बॅंकेने घातलेल्या अटी, तर दुसरीकडे तालुक्‍यातील उसाची पळवापळवी, तसेच कारखान्यापुढे असलेला आर्थिक डोंगर या दुष्ट चक्रात कारखाना सापडला आहे. यातून युवा नेते सुजय विखे काय पर्याय काढतात याकडे शेतकरी, सभासद, कामगारांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा बॅंकेने अनेकवेळा कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली. या ना त्या कारणाने जप्ती वारंवार तहकूब झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी आ. शिवाजी कर्डिलेंशी हातमिळवणी करून पर्याय काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार जिल्हा बॅंकेने नरमाईचे धोरण स्वीकारले. जिल्हा बॅंकेचे कारखान्यावर 84 कोटींचे कर्ज आहे. याबरोबरच हे सर्व मिळून कारखान्याला अडीचशे कोटींचे देणे आहे. या सर्व अडचणी पाहून डॉ. विखे यांनी तालुकावासीयांना यातून मार्ग काढून कारखाना चालू करण्याचा शब्द दिल्याने सभासदांनी कारखाना त्यांच्या ताब्यात दिला.

विखेंनीही आपली राजकीय पत पणाला लावून हे शिवधनुष्य उचलले. अखेर कर्डिले-विखेंनी हातमिळवणी करत जिल्हा बॅंकेने कारखान्याची कागदोपत्री जप्ती करावी व पुन्हा कारखाना संचालक मंडळाला हस्तांतरित करावा, हे धोरण स्वीकारले. जिल्हा बॅंक कारखाना आजही हस्तांतरित करण्यास तयार आहे.

मात्र, त्यासाठी कारखान्याला आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या एजन्सीचे पत्र देण्याची अट बॅंकेने घातल्याने ही प्रक्रिया मंदावली आहे. आज कारखाना बॅंकेच्या ताब्यात असल्याने बॅंकेची सिक्‍युरिटी कारखाना कार्यस्थळावर कार्यरत आहे. कारखान्याची मालमत्ता जवळपास 580 कोटींच्या आसपास आहे. पण, आज ती सर्व धूळखात पडून आहे. यात भंगारवालेही या मालमत्तेवर हात साफ करीत आहेत.

कारखाना व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात प्रवरा कारखान्यावर कर्ज काढून हा कारखाना चालू करण्याचा शब्द विखेंनी दिला होता. परंतु, त्या शब्दालाही ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती उद्‌भवल्याचे चित्र आहे. सर्वच तालुकावासीयांची कारखाना चालू व्हावा अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

गळीत हंगाम तोंडावर आला आहे. दसरा-दिवाळीला इतर कारखान्यांची चाके फिरणार आहेत. हा कारखाना दुरुस्तीसाठी काहीही झाले तरी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यातही क्रशिंगसाठी सध्या एकच मशिनरी चालू करण्याचे विखेंनी सांगितले आहे. सध्या बाहेरच्या कारखान्यांची यंत्रणा ऊस खरेदीसाठी तालुक्‍यात ठाण मांडून बसली आहे. 

त्यांच्या गळाला तालुक्‍यातले मोठे मासे लागले असून, त्यांच्यामार्फत ऊस खरेदीचा सपाटा सुरू आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील खासगी, सहकारी साखर कारखान्यांची यंत्रणा कार्यान्वित झाली असताना एकेकाळी तालुक्‍याची वैभवशाली परंपरा जपत असलेला हा कारखाना आज शेवटच्या घटका मोजतो आहे. 

तालुक्‍यातील या आजारी कामधेनूला वाचविण्यासाठी व जीवनवाहिनीला पुन्हा संजीवनी देण्यासाठी उसाची अशी पळवापळवी निषेधार्ह आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक मरकड यांनीही नुकताच राजीनामा दिला आहे. एकूणच या सर्व संकटांतून मार्ग काढून कारखाना सुरू व्हावा हीच माफक अपेक्षा शेतकरी, कामगार, सभासदांमधून व्यक्‍त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.