..तर आमदार राहुल यांना थांबवणार - कुंडलिकराव जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुलगा म्हणून नाही, तर तालुक्याचा आमदार म्हणून राहुलच्या कामावर आपण समाधानी असून, राज्यातील कारखानदारी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत. आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे काम चांगले सुरु असल्याचे कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी सांगितले. 


कुकडी सह.साखर कारखान्यावर काल पत्रकारांच्या हस्ते रोलिंग पूजन, वृक्षारोपण, तसेच येथील पिण्याच्या आरओ फिल्टर प्लाटचे देखील तहसीलदार महेंद्र माळी व बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी पत्रकार परिषदेत कुंडलिकराव जगताप बोलत होते. शिवाजीराव नागवडे हे आ.जगताप यांच्या कामावर नाराज असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर जगताप म्हणाले की,आ.राहुल हा शिवाजीराव नागवडे यांच्यापेक्षा अनुभवाने, वयाने लहान आहे. बापूंच्या राजकारणातील अनुभवा एवढेसुद्धा त्याचे वय नाही. राहुलला आमदार करण्यात शिवाजीबापूंचा मोठा वाटा आहे.राहुल चुकल्यास बापूंनी त्याचा कान धरावा.तरुणांकडून चुका होतातच्. राजेंद्र नागवडे चुकले किंवा आ.राहुल चुकला तरी बापूंनी हातात काठी घ्यावी तो अधिकार त्यांना आहे.

दोघेही त्यांना मुलासारखेच आहेत. तसेच आमच्याकडूनही काही चुका झाल्या त्या आम्ही मान्य करतो. तसेच आपण देखील नागवडे कुटुंबीयांना वेळोवेळी मदत केल्याचे सांगत. मला भाजपची उमेदवारी मिळालेली असतानासुद्धा माझे तिकीट कापून राजेंद्र नागवडेंना उमेदवारी दिली. तरीसुद्धा आपण स्वखर्चाने त्यांचा प्रचार केला. पाचपुते गृहमंत्री असताना त्यांना विरोध केला. त्यामुळे बापूंच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. 

काँग्रेस राष्ट्रवादीच्या चुकांमुळे जि.प,पं.समिती, नगरपालिका, बाजारसमितीची सत्ता भाजपच्या हातात गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच नागवडे कुटुंबीय व आमच्यात फूट पाडण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून, आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्यात वितुष्ट येणार नाही. बबनराव पाचपुतेंनी त्याची वाटही पाहू नये असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी बोलताना आ.राहुल जगताप म्हणाले की, ७५कोटी रुपयांचे कर्ज काढून कुकडी सह साखर कारखाना उभा केला. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत सरकारचे धोरण चुकीचे आहे. कर्जमाफीची घोषणा हा केवळ बागुलबुवा असल्याचे त्यांनी सांगितल. 

तसेच राज्यात विजेचा तुटवडा असतानाही सरकार कारखान्यांनी तयार केलेली वीज घेत नाही. बग्यासपासून निर्माण होणारी वीज ही इकोफ्रेंडली आहे. त्याचा पर्यावरणाला धोका नाही. सरकार बाहेर राज्यातून वीज खरेदी करतेय, त्यापेक्षा दोन रुपये कमी दराने त्यांनी कारखान्यांनी तयार केलेली वीज खरेदी करावी, असे मतही त्यांनी मांडले. 

यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक मरकड, उपाध्यक्ष विषवनाथ थोरात, संचालक एकनाथ बारगुजे, सुखदेव तिखोले, कुमार लोखंडे, स्मितल (भैया) वाबळे उपस्थित होते

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नागवडे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी मिळाल्यास आमदार राहुल याला थांबवणार असल्याचे कुंडलिकराव जगताप यांनी सांगितले. तसेच आम्हाला बापूंचा निर्णय मान्य असून, त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.