राहाता पालिकेच्या साठवण तलावाचे काम पूर्ण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता नगरपालिकेच्या नवीन पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आले असून, या कामाचा शेवटचा टप्पा असलेल्या कॅनॉलला जोडणाऱ्या गेटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये या नवीन साठवण तलावासाठी पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी दिली.

नगराध्यक्षा पिपाडा व भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून जलसंपदा विभागाचे अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तलावासाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनॉलच्या पाण्याची चाचणी तीन ते चार दिवसांत करावी याबाबत चर्चा केली. बाळासाहेब गिधाड, दीपक सोळंकी, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, डॉ. स्वाधीन गाडेकर, भाऊसाहेब आरणे, शुक्‍लेश्वर शेळके, शिवाजी आनप व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सन 2001 मध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी न.पा.वाडी शिवाराजवळ पालिका हद्दीत 20 एकर जागा साठवण तलावासाठी खरेदी केली तेव्हापासूनच त्यांनी या कामाला प्राधान्य दिले होते. सन 2006 पर्यंत हे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले होते. परंतु, गेल्या 10 वर्षांपासून या कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा 2017 मध्ये ममता पिपाडा यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

शहरवासियांना ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. प्रामुख्याने महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी दुष्काळाच्या काळात शहराला 15 दिवसांनी पिण्याचा पाणीपुरवठा झाला. या सर्व गोष्टींचा नगराध्यक्षांनी आढावा घेतला व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी लवकरच तलावाच्या ठिकाणी वीज जोडणी, इलेक्‍ट्रिक मोटार जोडणी व उर्वरित कामे येत्या महिन्यात पूर्ण करून तीन ते चार दिवसांत कॅनॉलद्वारे या तलावात पाणी सोडून चाचणी घेणार असल्याचे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.