पाच हजाराची लाच घेताना तलाठी सापळ्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्‍यातील कासारपिंपळगाव येथील जमिनीच्या केलेल्या खातेफोड प्रकरणाची महसुली नोंद लावण्यासाठी तलाठी किसन धनाजी पोटे यास गावातील तलाठी कार्यालयासमोर पाच हजार रुपयांची लाच शेतकाऱ्यांकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकविला. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्‍यातील कासारपिंपळगाव येथील तक्रारदार शेतकरी यांच्या आईने केलेल्या वाटणी पत्राप्रमाणे तक्रारदार यांचे नाव वाटणी पत्रात आलेल्या शेतजमिनीची महसुली रेकॉर्डला नोंद लावण्यासाठी तलाठी पोटे याने पंधरा हजार रुपयांची मागणी तक्रारदारकडे केली होती. त्यापैकी दहा हजार रुपये अगोदरच देण्यात आले होते. त्यानंतर नोंद झाल्यावर झालेल्या नोंदीचे उतारे व फेरफार देऊन तक्रारदार यांना देऊन पुन्हा राहिलेल्या पाच हजार रुपयांची मागणी तलाठी पोटे याने केली.

या दरम्यान तक्रारदार यांनी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क करत संबंधित तलाठी याची तक्रार केली. त्या तक्रारीवरून आज कासार पिंपळगाव येथील गावातील तलाठी कार्यालयासमोर तक्रारदार यांच्याबरोबर गाडीत बसून राहिलेल्या पैशाबाबत बोलत असतांना संबंधित शेतकरी यांच्याकडे असलेल्या पावडरच्या नोटा स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

यावेळी लाचलुचपतचे अधिकारी व तलाठी यांच्यात किरकोळ झटापट झाली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तक्रारदार शेतकरी व तलाठी पोटे यांचे मोबाईलवर पैशाबाबत झालेले संभाषण हे कारवाई करण्यासाठी पोलिसांना महत्वाचे ठरले.

ही कारवाई नगर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, पो. हे. कॉ. सुनील पवार, एकनाथ आव्हाड, प्रशांत जाधव, तन्वीर शेख,वाव्हळ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.