दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस अटक.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड  तालुक्‍यातील काटेवाडी येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गणपत बहीर यास पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून पोखरी (ता. आष्टी, जि. बीड) येथून अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि 12 मे रोजी पहाटे सहा वाजता तालुक्‍यातील काटेवाडी येथे जमिनीच्या वादातून आरोपी संदीप बहीर याच्यासह 33 जणांनी फिर्यादी बापूसाहेब आसाराम बहीर यांच्या घरावर तलवार, कोयते, चॉपर, लाठीकाठ्याने हल्ला केला. फिर्यादीचे वडील आसाराम यशवंत बहीर (वय 65) व भाऊ नितीन आसाराम बहीर (वय 26) यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये हे दोघे जागीच ठार झाले होते, तर फिर्यादी बापूसाहेब बहीर प्रसंगावधान राखून पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडातील 26 आरोपींना अटक केली होती. त्यातील मुख्य आरोपी संदीप गणपत बहीर (वय 30) हा जामखेड-नगर रस्त्यावरील पोखरी (ता. आष्टी) शिवारात एका हॉटेलमध्ये चहा घेत असल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांना मिळाली.

सहारे यांनी सहकारी हवालदार बाबासाहेब बडे, गणेश सोनवणे, गणेश साने व आष्टी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी संदीप बहीर यास ताब्यात घेतले.

मुख्य आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 8 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर दुहेरी हत्याकांडातील सुनावणी नगर येथील सत्र न्यायालयात चालू असून अंतिम टप्प्यात आहे. मुख्य आरोपी संदीप बहीर याच्यावर पुरवणी दोषारोप न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.