तूर घोटाळ्याचा अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-बाजार समिती तूर घोटाळा प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून गॅरेज मालकासह दोन्ही ट्रकच्या चालकांविरुद्ध साडेबेचाळीस टन तुरीची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी बाजार समितीचे सचिव दिलीप काटे यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीने तिसगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले. तिसगाव उपबाजार समितीचे गोडावून व व्यापारी गाळ्यांमध्ये मालाची साठवणूक केली. भोसरी (जि. पुणे) येथील शासकीय गोडावूनमध्ये माल पाठविण्यासाठी साई ट्रान्सपोर्टचे मालक अशपाक शेख यांच्यामार्फत दोन ट्रक भाड्याने लावल्या. ट्रक क्रमांक (एम.एच. 12. ए. डी. 6615) मध्ये 21 टन, तर गाडी नंबर (एम.एच.-12 एफ.सी.8035) मध्ये साडेएकवीस टन तूर भरून गेल्या. 28 एप्रिल रोजी रात्री भोसरीच्या वखार महामंडळाच्या गोदामाकडे ट्रक पाठविल्या. 12 तासात या गाड्या भोसरीमध्ये पोहोचणे आवश्‍यक होते. 30 तारखेला वखार महामंडळाकडून गाड्या पोहोचल्या नसल्याचे सांगण्यात आले.

2 मे 2017 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा होऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रान्सपोर्ट मालकासह चालक रामनाथ कारंडे व कैलास शिरसाठ दोघेही राहणार (टाकळीमानूर, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतल्यावर जिल्हा फेडरेशनकडून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याला दोन्ही ट्रक जमा असल्याचे बाजार समितीला समजले. तेथे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला. दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेट बदलल्याचे लक्षात आल्यावर चेसी नंबरवरून गाड्या ओळखण्यात आल्या. त्यानुसार ट्रान्सपोर्ट मालक व दोन्ही चालकांविरुद्ध फसवणूक, मालाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करत आहेत.

दरम्यान, तूर घोटाळा प्रकरणाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघून सत्ताधारी गटाविरुद्ध आमदार मोनिका राजळे यांनी टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र होऊन तालुक्‍याचे राजकारण ढवळून काढणारे ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आहे. तूर खरेदी प्रकरणाचा लाभ भाजपला तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत होऊन एकतर्फी सत्ता आली. भाजपने प्रचारात हाच मुद्दा ठेवून यंत्रणा फिरवली. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय चर्चेला गेला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.