प्रलंबीत मागण्यांसाठी पोलिस पाटलांचे लाक्षणिक उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस पाटील यांच्या महत्त्वाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सदर मागण्या पावसाळी अधिवेशनात मान्य न झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर 2 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.


नक्षलवादी भागात व डोंगर दर्‍यात पोलिस पाटील अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत. महाराष्ट्र ग्राम पोलिस पाटील अधिनियम 1967 मध्ये कोणत्याच प्रकारची तरतुद नसल्याने पोलिस पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. पन्नास वर्षाच्या काळात चार ते पाच वेळा तटपुंज्या प्रमाणात मानधनामध्ये वाढ करण्यात आली. 

पोलिस पाटील यांना महागाईच्या काळात तीन हजार मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठिण झाले असून, अनेक पोलिस पाटलांना मजुरी करावी लागत आहे. अनेक निवेदन देवूनही मागण्या मान्य होत नसल्याने, अशा अधिनियमात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

पोलिस पाटील यांना सन्माणाने जीवन जगण्यासाठी किमान दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे. शासनाशी संलग्न असणार्‍या प्रत्येकाला वैद्यकिय सेवेचा लाभ मिळत असून, तातडीने पोलिस पाटील यांना शंभर टक्के वैद्यकीय सेवा लागू करावी. अनुकंपा अ‍ॅक्ट लागू करुन, दरमहा पेन्शन योजना सुरु करावी. महाराष्ट्र ग्राम पोलिस पाटील अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करावी. तसेच पोलिस पाटील पद एका विभागाशी संलग्न ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या लाक्षणिक उपोषणात राज्याध्यक्ष मोहन शिंगटे, उपाध्यक्ष संजय वाबळे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कानवडे, ज्ञानदेव कळमकर, बापुसाहेब परकाळे, निलेश वाघ, विजयसिंग काळे, नंदकिशोर खपके, सिताराम अभाळे, अच्युत भागवत, विकास भागवत, वसंत वाघमारे, संतोष सांगळे आदिंसह जिल्ह्यातील पोलिस पाटील सहभागी झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.