अल्पवयीन मुलीशी विवाह करून अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पैशांच्या आमिषाने अल्पवयीन भाचीचे वयस्कर मुलाबरोबर लग्न लावण्याचा प्रयत्न राहुरी पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर मामाच्या साथीने संबंधित नवरदेवानेच मुलगी राहत्या घरातून पळवून नेली व राहुरी तालुक्‍यातील एका मंदिरामध्ये बळजबरीने लग्न लावले. त्यानंतर नातेवाईकांच्या घरी मुलीला आणून अश्‍लिल चित्रफीत दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर या नवरदेवाने राहुरी पोलीस ठाण्यासमोर मुलीला सोडून धूम ठोकली. कोपर्डीच्या घटनेला वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अत्याचाराचा प्रकार घडल्याने संपूर्ण तालुक्‍यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला त्वरित अटक करावी, यासाठी उद्या दि. 14 रोजी मढी बंदची हाक देण्यात आली आहे. गुन्हा दाखल केल्यास पीडिताच्या कुटुंबीयांना आरोपीकडून वेळोवेळी फोन करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा गेल्या 6 जुलै रोजी दाखल आहे. 2 जुलै रोजी आरोपी मुलीचा मामा बाळासाहेब मरकड याने अमोल कासार व नवरदेव नवनाथ ढोकणे यांच्या दुचाकीवर मुलीला पळवून नेले. तीन दिवस शोधाशोध घेऊन मुलीच्या आईने मुलगी पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पळवून नेल्यानंतर राहुरी येथील महादेव मंदिरात मुलीला घेऊन गेले. तेथे नवनाथ ढोकणे (नवरदेव), बापू गुरुजी (भटजी), बापू गुरुजीचा मुलगा, मंडपवाला दगडू (सर्व रा. उंबरे) यांच्या मदतीने लग्न लावले.

मुलीची इच्छा नसताना महादेवासमोर बळजबरीने लग्न लावण्यात आले. उंबरे येथे गेल्यावर आरोपीने मुलीला म्हैसगाव येथे नेले. 3 जुलै रोजी आरोपीने पीडितेला एका खोलीत नेले व मोबाइलमध्ये अश्‍लिल चित्रफीत दाखवत अत्याचार केले. 8 जुलै रोजी आरोपीने मुलीला आरोपीच्या बहिणीच्या घरी नेले. तेथे एक दिवस थांबून 9 जुलैला ताहाराबाद येथे मावशीच्या घरी नेले. तेथेही वारंवार अत्याचार केले. 

पोलिसांना काही सांगायचे नाही...
आरोपीला पीडितीने प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करताच त्याने तिला लाथाबुक्‍क्‍यांनी व काठीने मारहाण करून अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने काल दुपारच्या सुमारास पीडितेला राहुरी पोलीस स्टेशनसमोर आणून सोडले व “पोलिसांना काही सांगायचे नाही. मेडिकल करायचे नाही. चुलते व आईला सांग की 15 दिवसात उंबरे येथे आणून सोड अन्यथा एका एकाचा काटा काढीन,’ अशी धमकी आरोपी नवनाथ ढोकणे यानी दिली.

अपहरणाचा गुन्हा दाखल
नवनाथ ढोकणे, अमोल कासार, सुवर्णा अमोल कासार, मामा बाळासाहेब मरकड, मामी ताराबाई मरकड यांच्यासह मंडपवाला, भटजी, भटजीचा मुलगा, आदींविरूद्ध पीडितेने तक्रार नोंदविली आहे. सर्वच आरोपी फरार आहेत. दुपारी पीडितेची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पाथर्डी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा यापूर्वीच दाखल केला असून आता अत्याचाराचा गुन्हा नव्याने दाखल केला आहे.

आरोपीकडून पीडित मुलीला धमकी..
आरोपींना त्वरित अटक करण्यात येऊन माझ्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे अन्यथा मी जिवाचे बरेवाईट करीन. आता मला जगावेसे वाटत नाही. “पोलीस माझ्या खिशात आहेत. त्यामुळे तू फिर्याद देण्याच्या भानगडीत पडू नको,’ अशा शब्दांत नवनाथ ढोकणे याने पीडितेला धमकी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.