कर्जत तालुक्यातील विविध रस्ते खड्डेमय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असताना याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे का असा प्रश्न नागरिक विचारत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग काय करतो आहे असा मोठा प्रश्न उभा राहत आहे. कर्जत तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. 


कर्जत शहरातील नगर बारामती या मुख्य रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले आहेत. यातून अनेक वाहनांना अपघात होत आहेत. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कर्जत येथील संत श्री गोदड महाराज याचा रथोत्सव आठ दिवसावर आलेला असताना या रस्त्यातील खड्डयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापि गांभीर्याने पाहिलेले नाही. 

महाराजाचा रथ या रस्त्यावरून दोन वेळा जात असतो त्यामुळे हा रस्ता खड्डे मुक्त करणे आवश्यक आहे. याशिवाय तालुक्यातून जाणार्या नगर सोलापूर रस्त्यावरील टोल बंद झाल्यापासून खड्डेयुक्त रस्ता वाहन चालकांना अग्नीदिव्य ठरत आहे. याही रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग वेळोवेळी का भरत नाही असा मोठा गहन प्रश्न नागरिकाना सातत्याने पडतो आहे. 

कर्जत तालुक्यातील कर्जत ते राशीन रस्त्यावरील कोळवडी पर्यतच्या रस्त्यावर पूर्वीच्या जुन्या डांबरी रस्त्यावर नव्याने टाकलेला डांबराचा थर उखडून चालल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. जर नंतर केलेला रस्ता उखडत असेल व पूर्वीचा डांबरी रस्तां अजून हि चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत असेल तर या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डांबरी थराची चौकशी करणे गरजेचे आहे. 

राशीन परिसरात सुरु असलेल्या विविध कामाबाबत स्थानिक नागरिक तक्रारी करत असून त्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. खरे पाहता रस्त्याच्या काम सुरु असतानाच स्थानिक नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे मात्र त्याकडे प्रत्येक जन आपल्याला काय करायचे आहे असे म्हणत दुर्लक्ष करतो व खराब काम झाल्यानंतर प्रशासनाला दोष देत राहतो. 

तालुक्यात ना. प्रा. राम शिंदे याचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ सुरु आहे. जनतेने काम सांगावे व ते ना. शिंदे यांनी तात्त्काळ पूर्ण करावे असा कामाचा सपाटा सुरु आहे मात्र येणार्या कोटीच्या कोटी निधीतून उत्कृष्ट कामे होतात का हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधीची व पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे याच बरोबर विरोधक समजल्या जाणार्याची हि आहे मात्र या सर्वाकडून हे होतेच असे नाही. 

पालकमंत्री ना. राम शिंदे हे सातत्याने येणार्या निधीतून चांगले काम करा अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा सातत्याने देत असताना तालुक्यात खरोखरच कामाचा दर्जा चांगला आहे का हे तपासण्याची जबाबदारी पार पाडणे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षाचे व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक याचे हे काम असून हे सर्व जण याकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.