मुलीचे स्मारक पाहून आईचे अश्रू अनावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचे स्मारक बांधण्यात आले आहे. हे पीडितेचे स्मारक नसून समाधी आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी दिली. 


राज्यभरातून हजारो नागरिक यावेळी कोपर्डीत उपस्थित होते. पीडितेच्या कुटुंबीयांनाही इथे आणण्यात आले. स्मारकाजवळ येताच पीडितेच्या आईचा बांध फुटला आणि तिनं एकच आक्रोश केला. यावेळी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

ज्या भयान घटनेच्या आठवणीतून अनेकांची ह्दये पिळवटून निघत होती त्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत असताना कोपर्डी मध्ये पहावयास मिळत होता सर्वत्र संताप प्रत्येक जन एकच मागणी करत होता त्या नराधमांना फाशी कधी होणार ? एक वर्ष पूर्ण होत असताना वाहिल्या जाणाऱ्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे वेळीच उभ्या राहिलेल्या स्मारकाच्या वादातून कोपर्डीला आलेल्या पोलीसाच्या छावणीमुळे प्रत्येकाच्या मनात अनपेक्षित भीतीचे सावट उभे राहिले होते. 

मागील वर्षी याच १३ जुलै रोजी कोपर्डी येथे महाराष्ट्रासह देशाला हादरून सोडणारी घटना कर्जत तालुक्यात घडली होती. आज एक वर्ष पूर्ण होत असताना त्या घटनेच्या जखमा फक्त सुद्रिक कुटुंबीयाच्या काळजावरच पहावयास मिळत नव्हत्या तर याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मराठा व मराठेत्तर समाजाच्या मनात हि जाणवत होत्या. आजही या गावात या घटनेच्या ठिकाणी तो प्रसंग आठवला कि अंगावर रोमांच उभे राहत होते प्रत्येकाच्या मुठी आवळल्या जात होत्या व आपणच त्यां नराधमाचा गळा आवळावा असा आवेश अनेकांना निर्माण होत होता. 

या घटनेस एक वर्ष होत असताना अद्यापि त्या उमलत्या कळीला कुस्करणार्या नराधमांना शिक्षा मिळाली नव्हती. त्या नराधमांनी ज्या पाशवी व राक्षसी वृतीने त्या मुलीस आपल्या वासनांध प्रवृत्तीची शिकार बनवले होते ती नीच पातळी आठवली तरी प्रत्येक जण आतून संतापून उठत होता. आज कोपर्डी येथे या अत्याचारात बळी पडलेल्या मुलीला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संखेने परिसरातील नागरीकासह महाराष्ट्रातून अनेक संघटनाचे पदाधिकारी येथे आले होते. 

सकाळी 9 वाजताच या मुलीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हभप वासुदेव महाराज आर्वीकर यांचे समाजप्रबोधनपर किर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी या घटनेबाबत समाजमना मध्ये घडलेल्या बदलावर बोलत मराठा समाजाने एकत्रित संघर्ष केला पाहिजे असे सांगताना प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करा व्यसनापासून दूर रहा असे प्रबोधनात्मक विचार मांडले, यानंतर सर्वांनी या मुलीच्या समाधी स्थळासमोर जाऊन पसायदान घेतले.

यानंतर प्रत्येकाने चबुतर्यावर जाऊन पिडीत मुलीच्या फोटो पुढे फुले अर्पण करून मनोमन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी या मुलीची आई वडील भाऊ यांनी एकत्रित हार अर्पण करताना त्याच्या डोळ्यातील आश्रू पाहून अनेकांना आपले आश्रू आवरता आले नाहीत. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हा परिषद सदस्य उमेश परहर, राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंके, शहाजी राजेभोसले, नितिन धांडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शिवानंद भानुसे, छावा संघटनेचे युवा कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, आबा पाटील याचे सह राज्यभरातून व तालुक्यातून आलेले मराठा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

सूर्योदय परिवाराच्या वतीने कोपर्डी येथील निर्भयाच्या घरासमोर सुरु असलेल्या स्मारकावर मूर्ती बसविण्यात येणार होती याच बरोबर भय्यूजी महाराज याचे प्रबोधन हि होणार होते मात्र काल संभाजी ब्रिगेड ने या स्मारकास थेट विरोध केल्याने आज या ठिकाणी भय्यूजी महाराज यांनी येण्याचे टाळले व येथे उभारलेल्या चबुतर्यावरील चौकोनी बांधकामास या पीडीतेचा फक्त फोटो लावण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर परिसराला मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. 

हा आमचा घरगुती प्रश्न असून कोण काय म्हणतात हे पाहण्यापेक्षा आमच्या मुलीची आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी हि समाधी उभारली असून त्यासाठी कोणतीही शासकीय मदत आम्ही मागितली नाही. हे स्मृतीस्थळ (समाधी) असून त्यास कोणीही विरोध करू नये असे निर्भयाच्या वडीलांनी बोलताना सांगितले.

निसर्गही रडला काय ? 
एक वर्षापूर्वी घडलेल्या अमानुष घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज कोपर्डी येथे श्रद्धांजली वाहिली जात असताना सर्वाचे कंठ दाटून आले होते यावेळी झालेल्या मराठा क्रांती आढावा मेळाव्याच्या समारोप प्रसंगी निसर्गाला हि आपले आश्रू थांबवता आले नाहीत व गेली एक महिना दडी मारलेल्या वरूण राजाने अचानक पणे ह्जेरी लावल्याने निसर्गाने आपल्याही आश्रूना वाट मोकळी करून दिल्यासारखे वाटत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.