वर्षश्राद्ध अाले तरी काेपर्डीतील निर्भयाला अजून न्याय मिळाला नाही, अाईची खंत.


दैनिक दिव्य मराठी :ज्या अमानुष घटननंतर मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून निघाले त्या काेपर्डीतील (जि. नगर) निर्भयाचे तिच्या घरासमाेर श्रद्धांजली स्मारक उभे केले जाणार अाहे. १३ जुलै राेजी निर्भयावरील अत्याचाराला एक वर्ष पूर्ण हाेत अाहे.

यानिमित्ताने उभारलेल्या तिच्या स्मारकाच्या बांधकामावर निर्भयाचेच अाई-वडील डबडबल्या डाेळ्यांनी देखरेख करीत असल्याचे हृदयद्रावक दृश्य मंगळवारी पाहायला मिळाले. ‘माझ्या मुलीच्या बलिदानाने संपूर्ण समाज एकत्र आला, आरक्षणापासून कर्जमाफीपर्यंत अनेक मुद्दे पुढे आले, परंतु अाज वर्षश्राद्ध अाले तरी अजून माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही’, अशी खंत निर्भयाच्या आईने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

गेल्या वर्षी १३ जुलै काेपर्डीत एका निरागस मुलीवर नराधमांनी अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेनंतर राज्यभरातील सर्व पक्षीय नेते आणि संघटनांच्या आलिशान गाड्यांची जत्राच जणू काेपर्डीतील सुंद्रीक वस्तीवर जमत हाेती. हे शिवार अाज मात्र अाेस पडलेलं अाहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या घरासमाेर बंदोबस्ताला असलेले दोन पोलिस, घराशेजारील मंडपावर लावलेला भगवा झेंडा आणि जिथे आपली मुलगी खेळली त्याच शिवारात तिचे स्मारक उभारत असलेले निर्भयाचे आई-वडील, असे चित्र दिसले.

 ‘निर्भयाला आवडत होती म्हणून ही गुलाबाची झाडं लावली... आता तिचं स्मारक हीच काय ती तिची आठवण असेल, ‘असे निर्भयाची आई सांगत होती. घटना घडली तेव्हा सगळे आले, पण त्यानंतर गेल्या अकरा महिन्यांत कोणीच फिरकले नाही की, या प्रकरणाची साधी चौकशी कुणी केली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मागील वर्ष या कुटुंबीयांसाठी दुःखाचा डोंगर घेऊन आलं. पुरुषी वासनेपोटी पोटच्या गोळ्यांचा बळी गेला.

त्यानंतर कोपर्डी या छाेट्याशा गावाचे नाव राज्यभर गाजले. लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले. पीडितेचे आई- वडीलही बीड, सातारा आणि बारामतीच्या मोर्चात गेले होते. ‘प्रत्येक मोर्चात जाणं आम्हाला शक्य झालं नाही. वर्षभर आमच्या दवाखाना आणि कोर्टात चकरा सुरू आहेत,’ निर्भयाचे वडील सांगत होते. वर्षभरात सतत रक्तदाब वाढल्याने त्या दोघांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याचा खर्च लाख, दीड लाखाच्या घरात गेल्याचे ते म्हणाले. निर्भयाची आई आणि बहीण या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदार आहेत.

‘त्यासाठी वर्षभर नगर कोर्टात चकरा झाल्या. मुख्यमंत्री म्हणाले होते ७-८ महिन्यांत केस निकालात काढू, पण माझ्या मुलीला अजून न्याय मिळाला नाही,’ तिची आई सांगत होती. ‘माझ्या मुलीचं बलिदान गेलं म्हणून सर्व समाज एक झाला. त्यांचे अनेक मुद्दे पुढे आले. आरक्षण, कर्जमाफी.. ते सर्व बरोबर आहेतच. पण ज्यावरून याची सुरुवात झाली त्या माझ्या मुलीला न्याय देण्याचा मुद्दा मागे पडला, याचं दुःख वाटतंय,’ हे सांगताना निर्भयाच्या अाईला अश्रू अावरणे कठीण झाले हाेते.

नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात काेपर्डीच्या खटल्याची सुनावणी सुरू अाहे. गेल्या वर्षभरात या प्रकरणातील ३१ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या आहेत. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद अजून बाकी आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.