सोनाळवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इयत्ता ७ वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत गेली वर्षभर फक्त तीन शिक्षक असून यामुळे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यामुळे सोनाळवाडीच्या संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकले अखेरीस गटशिक्षणाधिकारी यांनी समक्ष भेट देऊन एका शिक्षकाला नियुक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असून या सात वर्गासाठी गेली वर्ष भर फक्त तीन शिक्षक कार्यरत असून मंजूर असलेला एक पदवीधर शिक्षक मिळावा या मागणी साठी गेली अनेक महिन्यापासून ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मागील वर्षी येथील मिसाळ या शिक्षिकेची बदली झाली यानंतर अनेक दिवस त्याचे जागेवर शिक्षकच मिळाला नाही त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सोडून दाखले नेण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे येथील पट संख्या कमी झाली पट संख्या कमी होताच शिक्षण विभागाने येथील एक शिक्षक कमी केला. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालक याची बैठक घेऊन शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेत या सर्वांनी कर्जत येथे १९ जून रोजी पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी याच्या भेटी घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली यावेळी चार दिवसात शिक्षक देतो असे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यास पंधरा दिवस होऊन हि शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

आज सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येत मुलांना बाहेर पडवीत बसवून थेट शाळेलाच कुलूप ठोकले. दुपार पर्यत शासकीय अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही मात्र दुपारी प्रशासन जागे झाले व प्रभारी गट शिक्षणाधिकारी उज्ज्वला गायकवाड, केंद्र प्रमुख डी एस कापरे, एस एस गुंड यांनी थेट गावात येऊन ग्रामस्थाशी चर्चा केली. गेली वर्षभर आम्ही फक्त एकच शिक्षक मागत होतो तो मिळाला नाही आता प्रत्येक वर्गाला शिक्षक मिळाल्याशिवाय आम्ही शाळाच सुरु करणार नाहीत अशी ताठर भूमिका ग्रामस्थांनी घेतली व उद्या सुट्टी असल्याने परवा पासून शाळाच बंद करून टाकू असे म्हटले.

यावर अधिकारी व ग्रामस्थ यांनी बरीच बाचाबाची झाली. सर्वांना शांत करत गायकवाड यांनी त्याचे म्हणणे लेखी घेतले मात्र चर्चेत अनेक वेळा दोन्ही बाजूने संयम सुटत होता शेवटी जिल्हा परिषदे कडून जो पर्यत पदवीधर शिक्षक मिळत नाहीत तो पर्यत याठिकाणी तात्पुरती एका शिक्षिकेची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले व वेताळवाडी येथील माने शिक्षिकेला काम सुरु करण्याचे आदेशहि दिले.

कमी शिक्षकामुळे आमच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होईल त्यास जबाबदार कोण असे प्रश्न ग्रामस्थ विचार असताना, शिक्षकाच्या कमतरतेमुळे मुलाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही व असा परिणाम दिसून आला तर या चारही शिक्षकांना मी स्वत: निलंबित करील असा ठाम विश्वास गायकवाड यांनी ग्रामस्थांना देतानाच हे चारही शिक्षक पूर्ण वेळ शाळेवरच राहतील कोणत्याच कारणामुळे यांनी शाळा सोडू नये जी माहिती लागेल ती केंद्रप्रमुख स्वत: येऊन घेऊन जातील असे हि आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्याण काळे, माजी अध्यक्ष सुभाष दिवसे, भाऊसाहेब काळे, उपसरपंच बंडू काळे बापूसाहेब भोंडवे, गणेश काळे, दिपक शिंदे, लहू काळे, बाळासाहेब काळे, संजय यादव, नवनाथ काळे, प्रसाद काळे, संजय काळे, अमर काळे, रोहन बोडसे, शरद काळे, ऋतुक कोंडवे, ओंकार पंडित, संदीप काळे, अभिषेक सुरवसे आदीं सह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

या शाळेचे मुख्याध्यापक अविनाश घोडके यांनी ग्रामस्थांनी कधीही आमच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावलेले नसून आम्हीही पूर्ण वेळ शाळेस देत आहोत व देणार आहोत असे म्हटले, यावेळी उपाध्यापिका पुष्पा आटोळे व वंदना घाडगे उपस्थित होत्या. याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्याण काळे, माजी अध्यक्ष सुभाष दिवसे, भाऊसाहेब काळेमास्तर, उपसरपंच बंडू काळे यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या व प्रशासनाने या ठिकाणी पुन्हा कोणताही बदल केला तर आम्ही पुन्हा शाळा कायमची बंद करू असा इशाराच शेवटी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.